नगर – देशभरात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, निकालाचे कल हाती येत आहेत. त्यानुसार अहमदनगर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आघाडी घेतली असून, महायुतीचे उमेदवार सुजय विखे पा. पिछाडीवर पडले आहेत. या आघाडीमुळे लंके यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु असून, तेच या मतदारसंघाचे ‘जायंट किलर’ ठरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या ‘मशाल’ने महायुतीला धक्का दिला असून, तेथे आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही विद्यमान खासदार पराभवाच्या छायेत आहेत. हा भाजपसह महायुतीतील घटक पक्षांना मोठा धक्का मानला जात आहे. दुपारी उशिरापर्यंत आलेल्या अधिकृत मतमोजणी फेरीनुसार दहाव्या फेरीअखेर अहमदनगरमधून लंके यांना २ लाख ६० हजार ९६ मते मिळाली तर विखे यांना २ लाख ५२ हजार ४६८ मते मिळाली आहेत. शिर्डीतून बाराव्या फेरीनुसार आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना २ लाख ८१ हजार ३८९ मते मिळाली तर महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना २ लाख ५९ हजार ५३९ मते मिळाली असून, वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांना ५७ हजार ८१० मते मिळाली आहेत. लोकसभेच्या अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि.४) सकाळी ८ वा. पासून एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात मोठ्या पोलिस बंदोबस्तात सुरू आहे. या मतमोजणीच्या सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली त्यानंतर मतदानयंत्रावरील मतमोजणीस सुरुवात झाली.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या २७ फेर्या होत असून विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी सुरू आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पा. आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात अतितटीची लढत होत आहे. ही निवडणुक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या प्रतिष्ठेची तर निलेश लंके यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. शिर्डीत महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे, महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे व वंचित आघाडीचे उत्कर्षा रुपवते यांच्यात तिरंगी लढत होत आहे. दुपारी उशिरापर्यंत हाती आलेल्या कलानुसार अहमदनगर मतदारसंघातून सुरुवातीच्या काही फेर्यांमध्ये आघाडीवर असलेले महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पिछाडीवर टाकत निलेश लंके यांनी आघाडी घेतली आहे. विखे यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासून आघाडी घेत ७ व्या फेरीपर्यंत आघाडी टिकविली होती मात्र त्यानंतर त्यांचे मताधिय कमी होत जाऊन लंके यांनी आघाडी घेतली आहे तर शिर्डी मतदारसंघातून महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आघाडी घेतली. दुपारी उशिरापर्यंत कायम टिकविली होती.
नामसाधर्म्यामुळे अपक्ष वाकचौरेंनाही मिळाली मते
शिर्डी लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावाचे आणखी एक उमेदवार भाऊसाहेब रंगनाथ वाकचौरे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. या नामसाधर्म्यामुळे अपक्ष उमेदवार वाकचौरे यांनाही लक्षणीय मते मिळाली आहेत. या उमेदवाराची मते सध्या चर्चेत आहे.
नगरमध्ये अनिल राठोड समर्थक, कार्यकर्त्यांचा जल्लोष
लंके यांनी विजयी आघाडी घेतल्याचे दुपारनंतर दिसून आल्याने कार्यकर्त्यांना मोठा जल्लोष करण्यास सुरुवात केली. नगरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माजी आ. स्व. अनिल राठोड यांचे फोटो घेऊन गुलालाची उधळण करत जल्लोष केला. पारनेर, शेवगाव, श्रीगोंदासह मतदारसंघात अनेक ठिकाणी लंके समर्थक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.