भरदिवसा घर फोडून लाखोंचा ऐवज लांबविला

0
24

नगर – घराला कुलूप लावून शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचे घर भरदिवसा फोडून रोख रक्कम, सोन्या – चांदीचे दागिन्यांसह ५ लाख ७३ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. नगर तालुयातील जांब गावाच्या शिवारात रविवारी (दि.२) सकाळी ११ ते दुपारी १२.३० च्या दरम्यान ही घटना घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत दत्तात्रय आसाराम पवार (वय ५७, रा,जांब,ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी पवार हे शेतकरी असून रविवारी (दि.२) सकाळी ११ च्या सुमारास ते घराला कुलूप लावून कुटुंबासह घरामागील शेतात कामासाठी गेले होते. दुपारी पुन्हा घरी आल्यावर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता घरात सर्वत्र उचकापाचक केल्याचे दिसून आले.

शिवाय घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोकड असा ५ लाख ७३ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी नगर तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले, नगर तालुका पोलीस ठाण्याचे स.पो.नि. प्रल्हाद गीते यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर पवार यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.