मंडळाच्या अध्यक्षासह डीजे मालकावर गुन्हा दाखल
नगर – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीदिनी सावेडी उपनगरातील सोनानगर चौक ते एकविरा चौक दरम्यान विनापरवाना मिरवणूक काढून डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी मंडळ अध्यक्ष व डीजे चालकाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार तनवीर शेख यांनी फिर्याद दिली आहे. स्वाभिमानी युवा प्रतिष्ठान पाईपलाइन रस्त्या मंडळाचे अध्यक्ष हेमंत नारायण मिश्रा (रा. प्रिन्स कॉलनी, पाईपलाइन रस्ता, सावेडी) व डिजे चालक आकाश ओमप्रकाश झाजोट (रा. आंबेडकर कॉलनी, भिमनगर, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
३१ मे रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सोनानगर चौक ते भिस्तबाग चौक ते एकविरा चौक दरम्यान स्वाभिमानी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिश्रा व डिजे चालक झाजोट यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विनापरवाना मिरवणूक काढून रस्त्याने येणार्या जाणार्या लोकांना रहदारीस अडथळा निर्माण होईल असे कृत्य केले. डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केले. आवाज कमी ठेवण्याबाबत बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सूचना देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केले. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अर्टी व शर्तीचे उल्लंघन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी मिरवणूक संपल्यानंतर डीजे साहित्य ताब्यात घेतले आहे.