‘स्कूल-२ होम कनेट’ हा शैक्षणिक उपक्रम महाराष्ट्र शासनातर्फे राबविला
नगर – ‘स्कूल-२ होम कनेट’ हा शैक्षणिक उपक्रम महाराष्ट्र शासन शिक्षण संस्थापर्यंत पोहोचवून साध्य करण्यात यशस्वी ठरले असून, या अभियानाला अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा मोलाचा हातभार मिळाला आहे. हे अभियान दोन टप्प्यांत राबविले जाणार आहे. २०२४-२५ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु होणार आहे. महाराष्ट्रात ४३ लाख विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य हे शैक्षणिकदृष्टया अत्यंत पुढारलेले असून, शिक्षण क्षेत्रात प्रत्येक नवीन संकल्पना आणि पायंडा पाडणारे राज्य ठरले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले. येथील न्यू लॉ कॉलेज आयोजित पारितोषिक वितरण समारंभात डॉ. देवळाणकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव अॅड. विश्वासराव आठरे पाटील होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सहसचिव जयंत वाघ, विश्वस्त सीताराम खिलारी, मुकेश मुळे, कार्यकारिणी सदस्या अरुणा काळे, अॅड. सुभाष भोर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, प्रा. विजयकुमार शिंदे आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एम. एम. तांबे यांनी स्वागत करताना महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, विद्यार्थी कल्याण मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, अभिरुप न्यायालय आदी उपक्रमांची माहिती देताना महाविद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचे सांगितले. सहसचिव जयंत वाघ यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजतागायतचा आढावा घेताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना विश्वासराव आठरे पाटील म्हणाले की, शिक्षण हे साधन नसून साध्य आहे. यातून नवचैतन्य, नवसांस्कृतिक, नवसमाज निर्माण करावयाचा आहे, तसेच नवीन शिक्षण धोरण अत्यंत महत्वाचे आहे. शिक्षण व्यवसायाभिमुख असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात काय करायचे आहे, ही भावना निर्माण करणे ही काळाची गरज आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष आणि पुणे विद्यापीठाचे माजी उपकुलगुरु डॉ. मोहनराव गंगाराम हापसे यांना आदराजली वाहण्यात आली. वार्षिक पारितोषिक समांरभांत शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक, विद्यार्थी कल्याण मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, अभिरुप न्यायालय आदी क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थ्यांचे पारितोषिक वाचन प्रा. डॉ. रामेश्वर दुसुंगे यांनी केले. प्रमुख अतिथी आणि पदाधिकार्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना सत्कार करून गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. प्रियंका खुळे-कांडेकर यांनी, तर आभार प्रा. डॉ. अतुल मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दुसुंगे, प्रा. सुनील जाधव, कार्यालयीन अधीक्षक पी. पी. म्हस्के, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.