वाचनातून संस्कारक्षम पिढी घडविण्यात जिल्हा वाचनालयाचे योगदान ‘अमूल्य’ : अशोक गाडेकर

0
63

जिल्हा वाचनालयाच्या बाल संस्कार शिबीरास भेट

नगर – सातत्याने मोबाईल इंटरनेट यांचे प्रस्थ वाढत असतांना उगवत्या पिढीवर वाचन व शिबीराच्या माध्यम ातून होणारे संस्कार हे संस्कारक्षम पिढी घडविण्यात महत्वपूर्ण ठरतील, असा विश्वास राज्याचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी व्यक्त केले. अहमदनगर जिल्हा वाचनालयात आयोजित बाल संस्कार शिबीरास संचालक अशोक गाडेकर यांनी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अधिक्षक अनिल बाविसकर, जालन्याचे ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकूर, अधिकारी संजय डाडर, श्री.सन्माने, संचालिका प्रा.ज्योती कुलकर्णी, ग्रंथपाल अमोल इथापे, सह.ग्रंथपाल नितीन भारताल उपस्थित होते. श्री.गाडेकर पुढे म्हणाले, वाचनाची चळवळ, संस्कृती, संस्काराचा वारसा जिल्हा वाचनालयाने शतकोत्तर जपला आहे. वाचनातून असंख्य पिढ्या व महान व्यक्ती घडवितांना बालकांच्या व्यक्तीमत्व विकास शिबीराचा चालू असलेला सातत्यपुर्ण प्रयत्न इंटरनेटच्या युगात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी संचालिका प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी शिबीरा विषयी माहिती देतांना मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी उपयुक्त असे उपक्रम या शिबीरातून घेतले जातात. मुला-मुलींचा व्यक्तीमत्व विकास या शिबीरातून साधला जात असल्याचे सांगितले. याप्रसंगी ग्रंथपाल अमोल इथापे यांनी ग्रंथालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी ग्रंथालय संचालक व उपस्थितांचा सन्मान संचालिका प्रा.ज्योती कुलकर्णी व ग्रंथपाल अमोल इथापे यांच्या हस्ते करण्यात आला. नितीन भारताल यांनी आभार मानले. सोनिया दोसानी या स्पर्धेत पंच म्हणून काम पाहत आहेत.