नगर – जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने तरुणाच्या हातावर चाकूने वार करत त्याला जखमी केल्याची घटना नगर तालुयातील सारोळा बद्धी गावात गुरुवारी (दि.२५) रात्री घडली. अमित दिलीप हजारे (वय ३२, रा. सारोळा बद्धी, ता.नगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. अमित हजारे हा त्याचे चुलते अर्जुन एकनाथ हजारे यांच्या घरी गुरुवारी रात्री जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला गेला होता. तेथे आरोपी दादासाहेब सायंबर हा आला व त्याने मागील भांडणाच्या कारणावरून अमित यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा अमित त्यास समजावून सांगत असताना सायंबर याने त्याच्या खिशातून चाकू काढत अमित याच्या हातावर वार केला. तसेच तु जर परत माझ्या नादी लागला तर तुझा काटा काढील अशी धमकी देवून तेथून निघून गेला. याबाबत अमित हजारे याने शुक्रवारी (दि.२६) नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी दादासाहेब सायंबर याच्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.