नुकतेच उद्‌घाटन झालेल्या विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राच्या प्रशासकिय इमारतीची पुन्हा तोडफोड सुरु

0
39

वरच्या मजल्याच्या कामासाठी खालच्या मजल्यावर चालवले जातेयं ‘ब्रेकर’; नियोजनाच्या अभावामुळे ‘सावळागोंधळ’

नगर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राच्या बाबुर्डी घुमट (तालुका नगर) येथील प्रशस्त अशा प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन होऊन अवघा सव्वा महिना झाला असतानाच या नवीन इमारतीची पुन्हा तोडफोड सुरू करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्याचे पॅरापेट आणि सिमेंट काँक्रीटचे बहुतांश कॉलम तीन ते चार फुटापर्यंत तोडण्यात आले आहेत या तोडफोडीमुळे या इमारतीचे मोठे नुकसान होत असून, इमारत डॅमेज होण्याचा धोका निर्माण होण्याची शयता आहे. या गंभीर प्रकाराची तातडीने दाखल घेऊन सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्रासाठी बाबुर्डी घुमटच्या ग्राम स्थांनी सुमारे ८३ एकर जमीन विद्यापीठाकडे वर्ग केली. विद्यापीठाच्या माध्यमातून गावाच्या विकासात भर पडेल हा त्या मागचा हेतू होता. जमीन ताब्यात घेतल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने संरक्षक भिंत उभारून ६ सप्टेंबर २०२२ रोजी प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन केले. साधारण एक वर्षाच्या कालावधीत बेसमेंट आणि पहिल्या मजल्याचे काम पूर्ण करत प्रशासकीय ईमारत पूर्ण झाली असल्याचा देखावा निर्माण करत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच ३ मार्च २०२४ रोजी या ईमारतीचा उद्घाटन समारंभ उरकण्यात आला. त्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला नव्याने झालेल्या या इमारतीवर ब्रेकर चालवण्यास सुरुवात झाली. कोणत्याही शासकीय विकास कामाची सुरुवात करताना कामाच्या ईस्टिमेंट, संकल्पचित्र यासह कामाच्या विस्तृत माहितीचा फलक कामाच्या ठिकाणी लावणे शासन नियमानुसार बंधनकारक आहे. परंतु उपकेंद्राच्या कामाची कोनशिला लावून भूमिपूजनापासून ते आजपर्यंत कामाच्या ठिकाणी कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे सदर इमारतीचे किती मजले आहेत, त्याची इस्टिमेंट कॉस्ट किती आहे, कामाची मुदत किती आहे या सर्व बाबी गोपनिय ठेवण्यात आल्या आहेत. या मागे विद्यापीठ प्रशासन, काम करणारी एजन्सी आणि शासनकर्त्यांचे काही साटेलोटे आहे का ?असा सवाल उपस्थित होत आहे.

इमारत अपूर्ण होती तर उद्घाटनाचा घाट का? उपकेंद्रांची ईमारत किती मजली, त्याचे क्षेत्रफळ किती, याबाबत विद्यापीठ प्रशासन व ठेकेदार वगळता कोणालाही काहीही माहिती नाही. इमारतीची बेसमेंट आणि पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रंगरंगोटी आणि अंतर्गत कामे पूर्ण करून तिचे उद्घाटन करण्यात आले. परंतु त्यानंतर अवघ्या सव्वा महिन्यांतच पुन्हा तोडफोड सुरू झाल्यानंतर दुसर्‍या मजल्याचे काम बाकी असल्याचे सांगण्यात आले. जर काम अर्धवट होते तर उद्घाटन करण्याचा घाट का घालण्यात आला? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तोडफोड आणि नुकसानीला जबाबदार कोण? शासन विद्यापीठाला मोठा निधी उपलब्ध करून देते, पालक वर्ग पोटाला चिमटा घेऊन आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी लाखो रुपये फी भरत असतात. जनतेच्या पैशातूनच विद्यापीठाला निधी जमा होतो परंतु चुकीच्या नियोजनामुळे निधीची उधळपट्टी केली जात असल्याचे उपकेंद्र इमारतीच्या तोडफोडीवरून दिसून येत आहे. जेवढे काम तोडले गेले आहे त्यावर झालेला लाखो रुपयांचा शासकीय खर्च तर पाण्यात गेलाच असून आता पुन्हा त्याच्या दुरुस्तीवरही लाखो रुपयांचा निधी खर्च करावा लागणार आहे. या चुकीच्या नियोजनाला आणि तोडफोड करण्यास जबाबदार कोण? त्याची सखोल चौकशी करून सदर नुकसानीची भरपाई करून घेणे आवश्यक आहे. ठेकेदाराच्या खर्चातूनच इमारतीची दुरुस्ती होणार : संचालक नंदकुमार सोमवंशी उपकेंद्राच्या प्रशासकिय इमारतीच्या कामासाठी शासनाचा निधी नसून विद्यापीठाचाच निधी आहे. इमारतीचे बेसमेंट आणि पहिल्या मजल्याचे काम झाल्यानंतर दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्याची मान्यता आली आहे. परंतु कामाची वर्क ऑर्डर यापूर्वीचीच आहे. वरच्या मजल्याचे काम करण्यासाठी पॅरापेट भिंत आणि साईटचे कॉलम तोडण्यात येत आहेत. कमीत कमी नुकसान होईल, याद़ृष्टीने ठेकेदाराला काळजी घेण्याची सूचना केली आहे. जे काही नुकसान होत आहे, त्याची जबाबदारी ठेकेदाराची असून, त्याने त्याच्या खर्चाने तोडफोडीची दुरुस्ती करून घ्यायची असल्याचे अहमदनगर उपकेंद्राचे संचालक नंदकुमार सोमवंशी यांनी सांगितले.

विद्यापीठातील तज्ञ मंडळीची ’होयबा’ निती अहमदनगर उपकेंद्राच्या ठिकाणी आता कुठे पहिली इमारत साकारत आहे. या पहिल्या ईमारतीच्या कामातच विद्यापीठ प्रशासनाचा भोंगळ आणि नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर आला आहे. विद्यापीठावर अनेक तज्ज्ञ मंडळी काम करत आहेत. परंतु चुकीच्या निर्णयांना मान्यता देऊन ’माना’ डोलावून जर विद्यापीठाचे काम करत असतील तर भविष्यात अहमदनगर उपकेंद्राच्या कॅम्पसमध्ये शासकीय आणि विद्यापीठाच्या स्वनिधीतून अनेक कामे होणार आहेत. त्यावेळी अशी अनेक उदाहरणे पुढे येतील यात तिळमात्र शंका नाही. गाव पुढार्‍यांची मात्र अळीमिळी गुपचिळी विद्यापीठ उपकेंद्र गावात व्हावे, यासाठी गाव पुढार्‍यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आणि तेवढ्याच विश्वासाने ग्रामस्थांनी त्यांना साथ दिली. परंतु आज मात्र उपकेंद्र आवरात काय चालू आहे याच्याशी या गाव पुढार्‍यांना काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. हारतुरे आणि मोठेपणा मिरविण्यातच गाव पुढारी धन्यता मानतात. मला काय भेटेल, माझा उध्दार कसा होईल, माझा उदो उदो कसा होईल, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.