दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका जणावर कोयत्याने हल्ला

0
42

कायनेटिक चौकातील घटना; तिघा युवकांवर गुन्हा दाखल 

नगर – दारू पिण्यासाठी १ हजार रूपये दिले नाही म्हणून युवकाला शिवीगाळ, मारहाण करून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना कायनेटीक चौकातील रविश कॉलनीत घडली. शुभम राजेंद्र शिरसागर (वय २३, रा. हंडी निमगाव ता. नेवासा, हल्ली रा. रविश कॉलनी, कायनेटिक चौक) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेश घोरपडे, मोंट्या व अक्षय (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. कायनेटीक चौक, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी सध्या कायनेटीक चौकातील रविश कॉलनीत रूमवर राहण्यास असून ते रांजणगाव (जि. पुणे) एमआयडीसीत खासगी नोकरी करतात. ते दररोज नगर ते पुणे खासगी बसने ये-जा करत असतात. बुधवारी (दि.३) रात्री साडेआठ वाजता ते त्यांच्या रूमवर असताना त्यांच्या ओळखीचे आदेश घोरपडे, मोंट्या व अक्षय तेथे आले. त्यांनी फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी १ हजार रूपयांची मागणी केली. फिर्यादीने त्यांना पैसे नसल्याचे सांगितले असता मोंट्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आदेश घोरपडे याने लोखंडी कोयत्याने हल्ला करून जखमी केले. तसेच अक्षय याने शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी फिर्यादी व त्यांचा मित्र दत्ता कडूस यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.