पाणी जपून वापरण्याचे मनपा प्रशासनाचे आवाहन

0
59

नगर – जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील . जलसाठ्यांची कमतरता विचारात घेऊन जलसंपदा विभागाने पाणी पुरवठ्यामध्ये २० टयांनी कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या पाणी कपातीच्या निर्णयाचा शहर पाणीपुरवठ्यावर देखील परिणाम होणार असून नागरिकांनी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून उपलब्ध होणारे पाणी पेयजल काटकसरीने वापरावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी केले आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरिभूमी प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या पाणी बचतीचा संदेश देणार्‍या भित्तीपत्रकाचे (पोस्टर) प्रकाशन आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त विजयकुमार मुंडे, श्रीकांत पवार, लक्ष्मीकांत साताळकर, आस्थापना विभागप्रमुख व माझी वसुंधरा अभियानाचे प्रमुख मेहेर लहारे, समन्वयक लक्ष्मण लांडगे, हरिभूमी प्रतिष्ठानचे अभय ललवाणी आदी उपस्थित होते. नागरिकांनी वाहने धुतांना, अंगणामध्ये सडा मारताना होणारा पेयजलाचा अपव्यय टाळावा, नादुरुस्त जलवाहिन्या दुरुस्त करून घेणे, गळके / टीपकणारे नळ दुरुस्त करून घेणे, पिण्यासाठी पेल्यात आवश्यक तेवढेच पाणी घ्यावे, एक-दोन दिवसापूर्वीचे पिण्याचे पाणी टाकून न देता त्याचा इतर वापर करावा, वॉश बेसिनचा नळ गरजेपुरता वापरावा आदी उपाययोजना करून पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन डॉ. पंकज जावळे यांनी केले आहे.