डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात १९१ कोटी रुपयांची ‘हेराफेरी’

0
43

लोणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल, तपासासाठी ऊस उत्पादक सभासदांचे पोलिस अधीक्षकांना निवेदन

नगर – प्रवरानगर (ता. राहाता) येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन, व्हा. चेअरमन आणि संचालक मंडळाने १९१ कोटी रुपयांची हेराफेरी करत १३० कोटी रुपयांनी तोट्यात असलेला कारखाना पुढच्याच वर्षी २१ कोटी रुपयांनी नफ्यात दाखवत ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि बँकांची फसवणूक केली असल्याचा आरोप करत तोट्यात असलेला कारखाना नफ्यात कसा दाखवला? असा सवाल अरुण कडू पाटील, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे, भास्कर फणसे, नितीन खर्डे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी लोणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, त्याची प्रत गुरुवारी (दि. ४) जिल्हा पोलिस अधीक्षक यांना सादर केली आहे. यासंदर्भात अरुण कडू पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याने कायद्यातील तरतुदीनुसार संस्थेच्या कामकाजाचा वार्षिक अहवाल, ताळेबंद, लेखापरीक्षण, नफा आणि तोटा यांचा हिशेब मागील वित्तीय कर्जाचा लेखापरीक्षण अहवाल इत्यादी बाबी वार्षिक सर्वसाधारण सभेत ठेवून सभासदांची मंजुरी घ्यावी लागते. अशी मंजुरी घेतल्यानंतर सभेत मंजूर केलेल्या आर्थिक पत्रकांमध्ये अकौंटींग स्टॅण्डर्डनुसार कुठलाही बदल करता येत नाही. परंतु कारखान्याने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात झालेल्या सर्वसाधारण सभेत सभासदांनी मंजुरी दिलेल्या पत्रकात बदल केला आहे.

कारखाना प्रशासनाने सन २०२०-२१ ची आर्थिक पत्रके तयार करताना ३१.३.२०२२ अखेरच्या ताळेबंदामध्ये न नमुना ताळेबंद तयार करण्यासाठी मागील ३१.३.२०२१ अखेर ताळेबंदाच्या रकमा बेकायदेशीररित्या बदललेल्या असल्याचे निदर्शनास आलेले आहे. घसारा निधीत १.७३ कोटीची तफावत, पुनर्मुल्यांकन निधीत ५५.४१ कोटीची तफावत, मुदत कर्जात ७२ कोटीची तफावत, ठेवींमध्ये ६.७९ कोटीची तफावत, ऊसबिलातील वसुलीत ६.७९ कोटीची तफावत, ऊसतोड व वाहतूक मजूर संस्था यांच्या खात्यातील रकमांबाबत संशय असून, कायम जिंदगीमध्ये १३७.९४ कोटीची तफावत दिसून येत आहे. २०२०-२१ व २१-२२ या दोन्ही आर्थिक वर्षात कारखान्याच्या ताळेबंदात प्रत्येक बाबीत तफावत दिसून येत आहे. रकमांच्या तपशिलात फेरफार करून मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे दिसून येत आहे. तसेच सदर आर्थिक पत्रके संचालक मंडळामार्फत व इतर अधिकार्‍यांमार्फत तयार करण्यात आलेली आहेत. ३१ मार्च २०२२ अखेरच्या ताळेबंद व नफातोटा पत्रक व त्याअनुषंगाने असलेल्या ७३ व्या वार्षिक अहवालात २०२१-२२ आरंभी रकमा ताळंबेदाच्या न नमुन्यात तफावत करत खोट्या रकमा नमूद करून बनावट अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रके, कागदपत्रे तयार करून त्याचा वापर केला आहे. आरोपींनी एकमिलापी होऊन कट रचून संगनमताने व अनाधिकाराने सदर रकमा स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे दिसून येत आहे. स्वतःचा फायदा करून फिर्यादी ऊस उत्पादक सभासद, शेतकरी, व्यापारी, वित्तीय संस्था व शासनाची फसवणूक करून तोटा केलेला आहे.

सभासदांची दिशाभूल करून संचालक मंडळाने गलथान व भ्रष्टाचारी कारभार केला असून, ऊस उत्पादकांची यातून मोठी फसवणूक करत ऊस भावात हेराफेरी केली आहे. बँकांना खोटी आकडेवारी दिल्यामुळे कर्जपुरवठादार म्हणून त्यांचीही फसवणूक व दिशाभूल केलेली आहे. व्यापारी व शासनाचीही यातून फसवणूक झालेली असून, याबाबत साखर आयुक्त पुणे, तृतीय विशेष लेखापरीक्षक वर्ग-१, सहकारी संस्था अहमदनगर यांच्याकडे योग्य कागदपत्रानुसार तक्रारी करूनही त्याची अद्याप दखल घेतली गेली नसल्याचे अरुण कडू पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात लोणी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असून, विद्यमान चेअरमन तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे संचालक मंडळ कार्यरत आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या लोणी पोलिस स्टेशन पूर्णपणे दबावाखाली असू शकते. सदर प्रकरण ऊस उत्पादक शेतकरी व विखे कारखान्याचे सभासद यांच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. तरी याबाबत फिर्याद नोंदवून या गुन्ह्याचा तपास करावा, अशी मागणी बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची गुरुवारी भेट घेत पत्राद्वारे केली आहे. यावेळी अरुण कडू पाटील, एकनाथ चंद्रभान घोगरे पाटील, भास्कर बाबुराव फणसे पाटील आदी उपस्थित होते.