बहुजन समाज पक्ष लोकसभा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा; महिला जिल्हाध्यक्षपदी अनुरिता झगडे यांची नियुक्ती
नगर – कांशीराम यांनी आंबेडकरी विचाराने समाजात कार्य केले. बहुजन समाजाचे हित जोपासून, त्यांनी नेहमी उपेक्षितांचे नेतृत्व केले. बाबासाहेबांचे कार्य पूर्ण करण्यासाठी आपले आयुष्य वेचले. बहुजन समाजातून शासनकर्ती जमात निर्माण करण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी कार्य केले. त्यांचा आदर्श समोर ठेवून महापुरुषांच्या विचारांवर विश्वास ठेवून लोकशाही मार्गाने कार्य करणार्या व्यक्तीला उमेदवारी देऊन लोकसभा निवडणूक बहुजन समाज पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा बहुजन समाज पार्टीचे जिल्हाप्रभारी सुनिल ओव्हळ यांनी केले. बहुजन समाज पार्टीच्या वतीने पक्षाचे संस्थापक नेते कांशीराम यांची जयंती शहरात साजरी करण्यात आली. शिल्पा गार्डन येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत जिल्हाप्रभारी ओव्हळ बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा प्रभारी राजू खरात, जिल्हा महासचिव राजू शिंदे, माजी प्रदेश कार्यकारणी सदस्य शंकर भैलुमे, जिल्हा बीव्हीएफ दत्ता सोनवणे, श्रीगोंदा विधानसभा प्रभारी विठ्ठल म्हस्के, दीपक नागले, शहराध्यक्ष फिरोज शेख, विधानसभा अध्यक्ष जाकिर शहा, आकाश शेंडे, प्रकाश अहिरे, बाळू काते, गणेश बागल, रवीनंद कुमार, मनीषा जाधव, संजय संसारे, किरण भोसले, संजय जगताप, संतोष मोरे, संस्कृती जगताप, संस्कार जगताप, रावसाहेब भोसले, अजय भैलुमे, कल्पना जाधव, माया खंडागळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उमाशंकर यादव म्हणाले की, जिल्ह्यातील नामांतराचा मुद्द उपस्थित करुन, जिल्हा विभाजनाच्या विषयाला तिलांजली देण्यात आली आहे. नागरिकांची दिशा भरकटवून राजकीय पुढील सत्तेच्या मस्तीत मश्गुल असून, त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी आपुलकी नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर लोकसभेत बहुजन समाजाला एकत्र करुन धर्मनिरपेक्ष उमेदवाराला उभे करुन किंवा बळ देवून काम केले जाणार आहे.
संविधान के सन्मान मे बीएसपी मैदान में! हे घोषवायाने पक्ष लोकसभेला सामोरे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक नेते कांशीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. कांशीराम अमर रहे… च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. या बैठकीत महिला जिल्हाध्यक्षपदी अनुरिता झगडे, जिल्हा कोषाध्यक्षपदी सूर्यभान गोरे, शिर्डी लोकसभा अध्यक्षपदी बाळासाहेब भोसले, विधानसभा अध्यक्षपदी बाळासाहेब काते, विधानसभा सचिवपदी राहुल जाधव, श्रीगोंदा विधानसभा प्रभारीपदी विठ्ठल म्हस्के, विधानसभा सचिवपदी अंबादास घोडके यांची नियुक्ती करण्यात आली. नुतन महिला जिल्हाध्यक्ष अनुरिता झगडे यांनी बहुजन समाजातील महिलांच्या प्रश्नावर कार्य करुन त्यांचे विविध समस्या सोडविण्याचे काम केले जाणार आहे. पक्षाच्या माध्यमातून महिलांना संघटित करण्यासाठी शहर व तालुकास्तरावर महिलांच्या शाखा निर्माण केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.