पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नगर – दोन जुळ्या मुलींना त्यांच्या राहत्या घरातून फूस लावून पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि.५) दुपारी केडगाव उपनगरात घडली. दोघी मुली अल्पवयीन असून त्यांचा शोध न लागल्याने नातेवाईकांनी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कुटुंबासह केडगाव उपनगरात राहतात. ते मंगळवारी सकाळी व्यावसायाच्या कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी त्यांच्या दोन्ही मुली, आई, पत्नी व मुलगा सर्वजण घरीच होते. ते दुपारी जेवणासाठी घरी आले असता त्यांना पत्नी त्यांच्या दुकानात दिसली. इतर लोक घरात दिसले नाही म्हणून त्यांनी चौकशी केली असता दोन्ही मुली घरात नसल्याचे दिसून आले. फिर्यादी व नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत. त्यानंतर फिर्यादी व नातेवाईकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस मुलींचा शोध घेत आहे. पोलीस अंमलदार एस. आर. लगड तपास करीत आहेत.