२ अल्पवयीन मुलींचे नगरमधून अपहरण

0
58

तोफखाना पोलिस ठाण्यात २ स्वतंत्र गुन्हे दाखल; अपहरणकर्त्यांचा शोध सुरु

नगर – नगर शहरातील लालटाकी परिसरातील एका महाविद्यालयाच्या परिसरातून १७ वर्षीय मुलीचे तर याच परिसरातील एका वसाहतीतून १२ वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याच्या २ वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात २ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत. नगर तालुयातील दौंड रोड वरील एका गावातून १२ वी परीक्षेचा पेपर देण्यासाठी एक १७ वर्षीय मुलगी शुक्रवारी (दि.२३) नगर शहरातील दिल्ली गेट पासून जवळच असलेल्या एका नामांकित कॉलेज मध्ये आली होती. त्या दिवशी रात्री १० च्या सुमारास तिने वडिलांना फोन करून मी मैत्रिणीकडे होस्टेल वरच राहणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा तिचा संपर्क झाला नाही. तिचा तिच्या कुटुंबीयांनी मैत्रिणी तसेच नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला मात्र तिची काहीच माहिती मिळू शकली नाही.

त्यामुळे आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाची तरी फुस लावून पळवून नेले असल्याचा संशय तिच्या वडिलांना आला. त्यानंतर सोमवारी (दि.२६) दुपारी नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुध्द भा.दं.वि.कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना लालटाकी परिसरातील एका वसाहतीत घडली आहे. या ठिकाणी राहणार्‍या एका १२ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने रविवारी (दि.२५) सकाळी ६ च्या सुमारास कशाची तरी फुस लावून पळवून नेले. ती मुलगी घरातून बेपत्ता झाल्यावर तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही त्यामुळे तिच्या मोठ्या बहिणीने मंगळवारी (दि.२७) दुपारी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुध्द भा.दं.वि.कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अपहरण झालेल्या या दोन्ही मुलींचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.