तासभर उचकापाचक करत चोरट्यांनी साधला डाव, घटना सीसीटीव्हीत कैद; गुन्हा दाखल
नगर – नगरमध्ये चोरट्यांना पोलिसांची अजिबातच भीती राहिलेली नाही, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. सावेडी उपनगरात तोफखाना पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले मोबाईल दुकान एका चोरट्याने फोडून दुकानात सुमारे तासभर उचकापाचक केली आणि दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेली ६९ हजारांची रोकड पळवून नेली. पोलिसांची कसलीही भीती न बाळगता अतिशय निवांतपणे केलेली ही चोरी दुकानातील सीसीटीव्ही कैद झाली आहे. याबाबत किरण गणेश कासार (रा. भिंगारदिवे मळा, भूतकरवाडी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कासार यांचे आकाशवाणी केंद्रासमोर असलेल्या साई पॅलेस इमारतीत एस एस मोबाईल शॉपी आहे. तेथे कासार यांच्यासह ५ कामगार काम करतात. मंगळवारी (दि.२०) रात्री ९ वाजता ते सर्वजण दुकान बंद करून घरी गेले. बुधवारी (दि.२१) सकाळी ८.३० च्या सुमारास त्यांच्या दुकानाशेजारील दुकानदाराने कासार यांना फोन करून तुमच्या दुकानाचे शटर थोडेसे उघडे असल्याचे त्यांना सांगितले.
ही माहिती मिळताच कासार हे तातडीने दुकानाकडे गेले. त्यांना दुकानाचे शटर उघडे तसेच लॉक तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी लगेच पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिस आल्यावर दुकानात पाहणी केली असता सर्वत्र उचकापाचक केल्याचे दिसून आले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर पहाटे २ च्या सुमारास तोंडाला काळ्या रंगाचे मास्क, काळा ट्रॅकसूट घातलेला एक तरुण दुकानात प्रवेश करतो. सुमारे तासभर तो सर्वत्र उचकापाचक करून गल्ल्याचे लॉक तोडून आत ठेवलेली ६९ हजारांची रोकड घेवून पहाटे ३ च्या सुमारास निघून जातो, असे दिसून आले. यानंतर कासार यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी त्या अनोळखी चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ३८०, ४५७ प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकच राहिला नाही
गेल्या काही दिवसांपासून तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. दररोज चोर्या, घरफोड्या, वाहनांच्या चोर्या होत आहेत. इतकेच काय तर पोलिस ठाण्याच्या आवारातच दोन गटात मारामार्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अवैध धंदेही मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. गुन्हे दाखल होण्याचे प्रमाणही मोठे आहे. पण दाखल गुन्ह्यांची उकल करण्यात तोफखाना पोलिस कमी पडत आहेत. गुन्हेगारांवर कारवाईच होत नसल्याने गुन्हेगार मोकाट आहेत. त्यांना पोलिसांची भीतीच उरलेली नसल्याने पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले दुकान चोरट्याने फोडण्याचे धाडस केले आहे. यामुळे गुन्हेगारांवर तोफखाना पोलिसांचा वचकच राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.