गुलमोहोर रस्त्यावरील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

0
80

नगर – गुलमोहोर रस्त्यावरील सुरभी हॉस्पिटलच्या बाजुला सुरू असलेल्या एका हुक्का पार्लरवर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने मंगळवारी (दि.२०) सायंकाळी छापा टाकला. हुक्का पार्लरच्या साहित्यासह सहा हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी हुक्का पार्लर चालविणारा फैजान कुतुबुद्दीन जमादार (वय २०, रा. दर्गा दायरा रस्ता, मुकुंदनगर) याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार सुयोग सुपेकर यांनी फिर्याद दिली आहे. गुलमोहोर रस्त्यावर सुरभी हॉस्पिटलच्या बाजूला आई कृपा जारच्या दुकानाच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक भारती यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, राजु जाधव, हेमंत खंडागळे, सागर व्दारके यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने पंचासमक्ष सदर हुक्का पार्लरवर छापा टाकला असता हुक्का पार्लरचे साहित्य मिळून आले. पोलिसांनी ते जप्त केले. सदर हुक्का पार्लर चालविणारा फैजान कुतुबुद्दीन जमादार (वय २०, रा. दर्गा दायरा रस्ता, मुकुंदनगर) याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.