नगर – शहराच्या उपनगरी भागात तपोवन रोड वरील एका अपार्टमेंट मधील फ्लॅट चोरट्यांनी भरदिवसा फोडून सुमारे २ लाख ३४ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा मोठा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि. १६) सकाळी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत घडली आहे. याबाबत पल्लवी देविदास अहिरे (रा. सुखकर्ता हाईट, नाना चौक, तपोवन रोड यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे सासू सासरे दवाखान्यात असल्याने त्या व त्यांचे पती त्यांना जेवणाचा डब्बा देण्यासाठी व भेटण्यासाठी नगरच्या साई माऊली हॉस्पिटल मध्ये सकाळी ११ च्या सुमारास गेले होते. जाताना त्यांनी फ्लॅटच्या दरवाजाला व्यवस्थित कुलूप लावलेले होते. सायंकाळी ५.३० च्या सुमारास ते पुन्हा घरी परतले असता त्यांना फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी आतमध्ये जावून पाहणी केली असता घरात सर्वत्र उचका पाचक केल्याचे दिसून आले.
तसेच कपाटात ठेवलेले ५ तोळे सोन्याचे दागिने, ८ भार चांदीचे दागिने व रोख रक्कम दिसून आली नाही. त्यामुळे घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच नगर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, तोफखान्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याबाबत पल्लवी अहिरे यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भा.दं वि. कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.