एमआयडीसी परिसरातील अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाईची मोहीम

0
68

नगर – एमआयडीसी परिसरातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली असून या मोहिमेत गावठी तसेच देशी- विदेशी दारू विक्री करणारे, मटका घेणारे यांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत अकिल पापाभाई शेख (वय ३७, रा.एमआयडीसी) याच्या ताब्यात ३२०० रुपये किंमतीची ३२ लिटर गावठी हातभट्टी ची दारू मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. दुसर्‍या ठिकाणी विशाल उर्फ डल्ली विष्णु शिंदे (रा. नागापूर) हा संशयितरित्या मिळून आल्याने त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात ९८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या १४ कॉटर, ९०० रुपये किमतीच्या मॅकडॉल व्हिस्कीच्या ६ कॉटर, ८०० रुपये किमतीच्या इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की च्या ५ कॉटर, ३ हजार रुपये किमतीची ३० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये असा एकून ५ हजार ६८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. तिसर्‍या कारवाईत दीपक मनोहर शेखटकर (रा. एमआयडीसी) हा एका टपरीच्या आडोशाला संशयितरित्या मिळून आल्याने त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात ३ हजार रुपये किमतीची ३० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू मिळून आल्याने ती जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चौथी कारवाई रेणुकानगर बोल्हेगाव येथे सुभाष वामन थोरात (वय ४५) याच्यावर करण्यात आली. तो विना परवाना कल्याण मटका खेळताना व खेळविताना मिळून आला म्हणून त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात १ हजार २० रुपये व कल्याण मटका खेळण्याचे साहित्य मिळून आल्याने त्याच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. एकूण ४ कारवायांमध्ये १२ हजार ९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.