नगर – नगर जिल्ह्यातुन दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. सर्फराज मोहम्मद इब्राहीम सय्यद उर्फ सरफराज जहागिरदार (वय ३३ रा. मुकुंदनगर) असे त्याचे नाव आहे. हद्दपार सरफराज जहागिरदार जुनी महानगरपालिका इमारतीजवळ असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांना खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. उपनिरीक्षक पाटील यांनी तात्काळ पथकासह जुनी महानगरपालिका गाठून हद्दपार इसम सर्फराज जहागिरदार यास ताब्यात घेतले. हद्दपार आदेशाचा भंग केल्याने त्याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पाटील, अंमलदार तनवीर शेख, सतीष भांड, संदीप पितळे, दीपक रोहकले, तान्हाजी पवार, सत्यजित शिंदे, सुरज कदम यांनी सदरची कामगिरी केली.