मालट्रकच्या विक्री व्यवहारात केडगावमधील एकाची फसवणूक

0
13

नगर – बँकेचे लोन असलेला मालट्रक घेवून त्याचे लोनचे हप्ते न भरता मालट्रक परत देण्यास नकार देत एकाने केडगाव येथील एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रदीप रावसाहेब गर्जे (रा. मोहिनीनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गर्जे यांनी अशोक लेलंड कंपनीचा मालट्रक बँकेचे लोन घेवून खरेदी केलेला होता. तो मालट्रक त्यांनी भाऊसाहेब दशरथ काळे (रा. उंबरे, ता. राहुरी) यांना विकला होता. त्यावेळी काळे यांनी बँकेचे लोन चे हप्ते भरायचे आणि लोन नील झाल्यावर गर्जे यांनी मालट्रक काळे यांच्या नावावर करून द्यायचे ठरलेले होते. मात्र काळे याने बँकेचे लोन वेळेत न भरता ते थकविले. याबाबत गर्जे हे त्यास विचारणा करण्यासाठी आणि मालट्रक पुन्हा माघारी आणण्यासाठी गेले असता काळे याने उडवाउडवीची उत्तरे देत मालट्रक देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर गर्जे यांनी गुरुवारी (दि.८) सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब काळे याच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ४०६, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.