‘नव हिम सह्याद्री ट्रेकर्स’ नगरच्या सदस्यांनी मांजरसुंबा गडावर फडकवला तिरंगा व भगवा

0
11

हिंदवी स्वराज्याचे ३५० वे वर्ष या निमित्ताने अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघ,मुंबईच्या वतीने प्रजासत्ताक दिन महाराष्ट्र व कर्नाटक येथील ३५० पेक्षा जास्त गड किल्ल्यांवर भारतीय तिरंगा व स्वराज्याचा भगवा ध्वज फडकविण्याचा संकल्प पूर्ण केला.

नगर – वर्ष २०२४ हे हिंदवी स्वराज्याचे ३५० वे वर्ष या निमित्ताने अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघ, मुंबईच्या वतीने प्रजासत्ताक दिन महाराष्ट्र व कर्नाटक येथील ३५० पेक्षा जास्त गड किल्ल्यांवर भारतीय तिरंगा व स्वराज्याचा भगवा ध्वज फडकविण्याचा संकल्प पूर्ण करण्यात आला. तसेच शिव प्रतिमेच्या पूजनाचा उपक्रम सर्व गड किल्ल्यांवर राबविण्यात आला. विविध ट्रेकिंग ग्रुप च्या माध्यमातून ३७३ गड किल्ल्यांवर भारतीय तिरंगा व स्वराज्याचा भगवा ध्वज फडकविण्यात आला. २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा विशेष उपक्रम साजरा करण्यात आला. या मध्ये महाराष्ट्र व कर्नाटकातून दहा हजारहुन अधिक शिवप्रेमी व दुर्गप्रेमींनी सहभाग नोंदविला आहे. अहमदनगर येथील मांजरसुंबा गडाचे नेतृत्व नव हिम सहयाद्री ट्रेकर्स गिर्यारोहक भरत झंवर यांनी केले. नगर, वांबोरी, मांजरसुंबा गाव, पिंपळगाव माळवी, नवनागपूर, भिंगार येथील तब्बल ३७ तरुण तरुणींनी एकत्र येऊन मांजरसुंबागड येथे भारतीय तिरंगा व स्वराज्याचा भगवा ध्वज फडकविण्याचा संकल्प पूर्ण केला. भारतीय तिरंगा फडकवण्याचा अमर काळे तर भगवा फडकविण्याचा मान स्मिता बुचडे यांना देण्यात आला. यावेळी गड किल्ले संवर्धनासाठी शिव प्रतिज्ञा करण्यात आली व स्वच्छतेची शपथ घेतली गेली. त्यानंतर सहभागी सदस्यांनी मांजरसुंबागडाची स्वच्छता केली व गावातील कचरा पेटीमध्ये दोन पोती कचरा टाकून देण्यात आला. गडावरील थोडीशी माती व पाणी यावेळी सोबत घेण्यात आली. लवकरच ६ जून २०२४ रोजी किल्ले रायगड येथे शिवराज्याभिषेक दिनी विविध गड किल्ल्यावरून जमा केलेल्या मातीचा वापर करून वृक्षारोपण व पाण्याचा वापर करून शिवरायांच्या चरणी जलाभिषेक होणार आहे असे गिरीप्रेमी, पुणे या संस्थेच्या उमेश झिरपे यांनी सांगितले. विशेष बाब म्हणजे या उपक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया यामध्ये होत आहे. या उपक्रमामध्ये गिर्यारोहक भरत झंवर, अमर काळे, ऋषिकेश काळे, सोहम काळे, रोहन नंदाल, ऋषिकेश कुंटला, यशदीप दासर, ओंकार वालझाडे, गौरव पवार, सौ. शोभा नवनाथ कदम, नवनाथ रोहिदास कदम, सुनीता देविदास कदम (ग्रामपंचायत सदस्य, मांजरसुम्भागड), आदित्य मते, इरफान पठाण, विष्णू मद्राल, पल्लवी नाईकनवरे, स्पंदन सोनवणे, नूतन शेळके, निहार पोकळे, इसरार शेख, विक्रम मते, सोम कुलथे, विनायक डोंगरे, श्रीकांत आंग्रे, हर्षाली आंग्रे, स्नेहा सोनवणे, अनिता मरकड, स्मिता बुचडे, प्रज्ञेश बुचडे, प्रथमेश गांधी, वैष्णवी पालवे, नित्या पारेख, मैत्री पुपाल, विराज टाक, अमित सचदेव, आर्यन मडूर असे ३७ जण सहभागी झाले होते.