मराठा सर्वेक्षणासाठी महानगरपालिकेने शहरात नियुक्त केलेल्या १७० कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द

0
110

नवीन प्रगणकांच्या केल्या नेमणुका, सावळ्या गोंधळानंतर अशिक्षित, आजारग्रस्त व मोबाईल ऑपरेटिंग करता येत नसलेल्या कर्मचार्‍यांना वगळले.   

महापालिकेने शहरातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या ८९८ कर्मचार्‍यांपैकी तब्बल १७० कर्मचार्‍यांच्या नियुत्या रद्द केल्या असून, त्यांच्याजागी नवीन कर्मचारी नेमले आहेत. या सर्व कर्मचार्‍यांना सर्वेक्षणाबाबत प्रशिक्षणही देण्यात आले आहे. सर्वेक्षणासाठी अशिक्षित, विविध आजाराने त्रस्त तसेच ज्यांना मोबाईल ऑपरेटिंग जमत नाही अशा कर्मचार्‍यांच्या नियुत्या रद्द करून त्यांच्या जागी नवे कर्मचारी नेमले असून, आतापर्यंत शहरातील १२ हजार मराठा कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती महापालिकेचे आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांनी दिली आहे. मराठा सर्वेक्षणाचे काम २३ जानेवारीपासून ते ३१ जानेवारीपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने विविध संवर्गातील ८९८ कर्मचारी नियुक्त केले आहेत. परंतु यातील अनेक कर्मचार्‍यांना मोबाईल ऑपरेटिंग करणे जमत नसल्याने सर्वेक्षणाच्या कामात अडचणी येत होत्या. तसेच त्याबाबत नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच अनेक कर्मचारी विविध आजारांनी त्रस्त असूनही त्यांना सर्वेक्षणाचे काम दिल्याने कर्मचारी व नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त होत होती. नियुक्त केलेले काही कर्मचारी अशिक्षित असल्याचे सर्वेक्षणावेळी निदर्शनास आले. पहिली पास नसलेले कर्मचारीही सर्वेक्षणाच्या कामात आढळून आले. याबाबत नागरिकांनी महापालिकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला. अशिक्षित, तांत्रिकदृष्ट्या अप्रशिक्षित तसेच आजारी कर्मचारी सर्वेक्षण करत असतील तर हे काम कसे पूर्ण होणार, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत होता. नागरिकांच्या तक्रारी तसेच सर्वेक्षणाची वेळमर्यादा विचारात घेऊन महापालिका प्रशासनाने तातडीने यातील १७० कर्मचार्‍यांच्या नियुत्या रद्द करत त्याजागी नवीन प्रगणक नियुक्त केले आहेत.

पद गवंडी असले तरी काम मात्र लिपिकाचे

महापालिकेतील गवंडी पदावर कार्यरत असलेल्या एका कर्मचार्‍याला केडगाव उपनगरात सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. त्याबाबत नागरिकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत गवंडी कर्मचार्‍याकडून सर्वेक्षण कसे होणार असा सवाल उपस्थित केला होता. याबाबत आस्थापना विभागप्रमुख लहारे यांना विचारणा केली असता तो कर्मचारी महापालिकेत गवंडी पदावर जरी नियुक्त असला तरी तो प्रत्यक्षात लिपिकाचे काम करत असून तो प्रशिक्षित आहे तसेच मोबाईल ऑपरेटिंगही तो व्यवस्थित करत आहे. त्यामुळे सर्वेक्षणाच्या कामात कोणत्याही अडचणी त्यास येत नाहीत. पदाचा आणि सर्वेक्षणाच्या कामाचा कोणताही संबंध नसल्याचे यावरून स्पष्ट होते.