नगर – आर्मीच्या जागेवर केलेले अतिक्रमण आर्मीच्या अधिकारी व कर्मचार्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास काढले. मात्र या कारवाई बाबत एका महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आर्मीच्या सुमारे १५० ते २०० अधिकारी व कर्मचार्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीमती लता विठ्ठल काळे (वय ६४, रा. सीएचटी टागोर नगर, विक्रोळी पुर्व, मुंबई, हल्ली रा. दिल्ली) यांनी याबाबत गुरुवारी (दि.११) फिर्याद दिली आहे. नगर-पाथर्डी रस्त्यावरील भिंगार कॅन्टोनमेंट हद्दीत आर्मीची जागा असून त्या जागेवर फिर्यादी यांनी दुकानाचे बांधकाम केले होते. काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास आर्मीच्या १५० ते २०० अधिकारी, कर्मचार्यांनी सरकारी वाहनातून बंदूका येऊन येत जेसीबीच्या सहाय्याने सदरचे बांधकाम पाडून व त्याचे साहित्य, गल्ल्यातील पैसे घेऊन जात ४० लाख रूपयांचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी लता काळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३९५, ४५२, ४४७, १४३, १४७, २८३ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करीत आहेत.