व्हिडिओ व्हायरल केल्याच्या कारणातून गोळ्या घालून खून करण्याची धमकी

0
117

नगर – सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल केल्याने किरण गुलाबराव काळे (रा.भूतकरवाडी, नगर) यांना एकाने भर चौकात गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी (दि.१२) रात्री ९.२८ च्या सुमारास माळीवाडा येथील मराठा मंगल कार्यालयाजवळ घडली. तर त्याच व्यक्तीने मनोज गुंदेचा यांनाही कोतवाली पोलिस ठाण्यासमोर धमकी दिल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांप्रकरणी गौरव उर्फ बंटी परदेशी (रा. चितळे रोड, नगर) याच्या विरुद्ध काळे व गुंदेचा यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण काळे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे की, शुक्रवारी (दि.१२) रात्री मराठा समाजाच्या मंगल कार्यालया जवळ एका कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी कार्यकर्त्यांसह गेलो असता इसम नामे गौरव उर्फ बंटी परदेशी (रा. चितळे रोड) हा आपल्या जवळ आला आणि म्हणाला की तू अरुणकाका जगताप व संग्रामभैय्या जगताप यांच्या विरोधात तीस मिनिटांचा व्हिडिओ का व्हायरल केला? त्यांना अरे तुरे करत का बोलला? आत्ता कट्टा नाही. असता तर इथच छाताडात सहा गोळ्या ठोकल्या असत्या, परत जर तु अरुण काका व संग्राम भैय्या विरुद्ध बोलला तर तुला तुझ्याच काँग्रेसच्या शिवनेरी कार्यालयासमोर भर चौकात गोळ्या घालून तुझा खून करील, अशी धमकी दिली. यावेळी तो दारू पिलेला होता, असे काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी भा.द.वी. कलम ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर मनोज गुंदेचा यांनी फिर्यादीत म्हंटले आहे की आपण कोतवाली पोलिस ठाण्यात जात असताना गौरव उर्फ बंटी परदेशी याने आवाज देवून थांबवत तुझा नेता किरण काळे माझ्या विरोधात फिर्याद देत आहे. त्याला सांग तु काहीही कर त्या किरण काळेचा मी खून करणार म्हणजे करणारच असे म्हणत त्याने आपल्यालाही दमदाटी केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी भा.दं. वि. कलम ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.