टेम्पोतून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तिघांना पकडले; साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

0
84

जामखेड रोडवर चिचोंडी पाटील शिवारात पकडलेला गुटख्याचा साठा व आरोपींच्या समवेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.

दोन टेम्पोतून गुटख्याची वाहतुक करणार्‍या श्रीरामपूरच्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चिंचोडी पाटील (ता. नगर) शिवारात पकडले. गुटखा, टेम्पो, मोबाईल असा १२ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार शिवाजी ढाकणे यांच्या फिर्यादीवरून एकुण आठ जणांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जण पसार झाले आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दानिश मोहंमद सय्यद (वय २१), जाकीर कादर शेख (वय २४ दोघे रा. सुभेदार वस्ती, वार्ड नंबर २, श्रीरामपूर), अफसर हसन पठाण (वय ३० रा. जवाहरवाडी, एकलहरे, ता.श्रीरामपूर) यांना पकडण्यात आले असून शाहरूख शहा, रिजवान शेख, नदीम शेख (पूर्ण नावे माहिती नाही, रा. वार्ड नंबर २, श्रीरामपूर), राजु शेख व वसीम (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. बीड) हे पसार झाले आहेत. काही इसम टेम्पोतून गुटख्याची वाहतुक करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यांनी चिंचोडी पाटील शिवारात सापळा रचून संशयीत दोन टेम्पो पकडले. त्यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले असून २ लाख ४० हजाराचा हिरा पानमसाला, ६० हजाराचा रॉयल ११७ गुटखा, तीन मोबाईल व दोन टेम्पो असा १२ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, पो.हे.कॉ.सचिन आडबल, पो.ना.संतोष खैरे, पो. कॉ.शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस अंमलदार खरात करीत आहेत.