पर्यटन, ऐतिहासिक वास्तू संवर्धनासाठी निधी उपलब्ध करुन किल्ल्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा

0
72

जयंत येलुलकर यांची पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे व खा.डॉ.सुजय विखे पा. यांच्याकडे मागणी

जगातील अनेक देशांचे अर्थकारण तेथे लाभलेली निसर्गसंपदा, तेथील इतिहास, जतन केलेल्या प्राचीन, ऐतिहासिक वास्तू यामुळे वाढलेले पर्यटक यावर अवलंबून असून, त्या त्या देशांनी, तिथल्या शहरांनी आपले महत्व ओळखून पर्यटनाला चालना दिली. या त्यांच्या दूरदृष्टीने त्यांची शहरे समृध्द झाली. पंच शताब्दीचा इतिहास लाभलेल्या ऐतिहासिक वास्तू अन् महत्वाची धार्मिक स्थळे असलेल्या आपल्या शहराला काळाची पावले ओळखून पर्यटनाचे, ऐतिहासिक वास्तू संवर्धनाचे महत्व लक्षात घेऊन त्यादृष्टिने समृध्द करण्यासाठी निदान या जन्मात तरी काही ठोस पावले उचलली जाणार आहेत की नाहीत? असा सवाल रसिक ग्रुपचे अध्यक्ष व माजी नगरसेवक जयंत येलुलकर यांनी केला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ. सुजय विखे यांना निवेदन देताना नगरकरांची भावना त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. अहमदनगर शहर ऐतिहासिक, धार्मिक वारसा लाभलेले शहर आहे. ज्यांना या शहराची माहिती आहे. ते या शहराला जाणून घेण्यासाठी तेथील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्थळांना भेट देण्यासाठी पर्यटक, भाविक येत असतात. एकदा एखाद्या शनिवारी, रविवारी चाँदबीबी महाल येथे भेट देऊन पहा, राज्यातील, परराज्यातील पर्यटकांची येथे होणारी गर्दी पाहून तुम्हीही नक्कीच हरखून जाल. ज्यांना कोणाला येथील माहिती आहे. कोणाकडून ज्यांनी ऐकले आहे ते येथे भेट देतात. इथल्या वातावरणात हरवून जातात. इथल्या इतिहासाला जाणून घेतात.अन् आपल्या वाटेला निघून जातात. आपल्या शहराचे कोणतेही मार्केटिंग नाही, पर्यटनाच्या विकासासाठी कोणतीही प्रयत्न नाहीत. येथील विविध ऐतिहासिक स्थळी जाण्याची कसलीही सुविधा नाहीत की धड रस्ते नाहीत. दुर्दैव म्हणजे आपल्या शहराच्या समृद्ध ऐतिहासिक, धार्मिक वारसा लाभलेल्या विविध स्थळांचे जतन करण्याचे कोणतेही प्रयत्न नाहीत. आजवर तेथे पर्यटनाच्या दृष्टिने ठोस असा विकास करण्यासाठी कोणतेही खास असे झालेले नाही किंवा प्रयत्न करण्याची मानसिकताही कधी दिसली नाही. आजपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर जे काही प्रयत्न झाले, त्यावरच समाधान मानले गेले. कोणाही नेत्यांना वाटत नाही की, या शहराचा पर्यटन विकास व्हावा. पर्यटनाच्या नकाशावर आपले शहर यावे. खरेतर दक्षिणेकडून शिर्डीला जाणारे हजारो भाविक याच शहरातून साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतात. परंतू शहराची कोणतीही ओळख त्यांना नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. आपल्या शहराचा समृध्द धार्मिक, ऐतिहासिक इतिहास पाहता येथील प्राचीन वास्तू, धार्मिक स्थळे पाहता आपल्या अहमदनगरचे नाव देशातील पर्यटन शहराच्या यादीत अग्रक्रमाने घ्यावे लागेल इतकी संपदा आपल्याकडे आहे. केवढा गौरव वाटायला हवा आपल्याला की, तुळजापुर येथील तुळजा भवानी देवी आपल्या बुर्‍हाणनगर येथून तुळजापूरला गेली आहे, ही अख्यायिका आहे. आजही नवरात्रात तुळजापूरला देवीच्या विश्रांतीसाठी असलेला पलंग अहमदनगर येथून तुळजापूरला येत असतो. हा मान येथील वंश परंपरागत पुजारी भगत कुटुंबीयांना आहे अन् त्यासाठीचा पलंग बनविण्याचा मान पलंगे कुटुंबीयांना आहे. येथे आंतरराष्ट्रीय संत अवतार मेहेरबाबा, जैन धर्मगुरू आनंदऋषीजी महाराज यांची समाधी असलेले आनंदधाम, बुर्‍हाणनगर येथील जगदंबा तुळजा भवानी माता मंदीर, मालोजी राजे भोसले यांनी छत्रपती शहाजीराजे, काका छ.शरीफजी राजे यांचे नाव ज्यावरून ठेवले ती शाह शरीफ दर्गा, माळीवाडा येथील शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती, प.पू क्षीरसागर महाराजांचे दत्त देवस्थान, ह्युम मेमोरियल चर्च, भुईकोट किल्ला, फराह बाग, आशिया खंडातील एकमेव रणगाडा म्युझियम, हस्त बेहस्तबाग, चाँदबीबी महाल, चौथे शिवाजी महाराज समाधी स्थळ, गोरक्षनाथ गड, मिरावली बाबा, आलमगीर, निसर्गरम्य साईबन, केडगावचे रेणुका माता मंदिर, वास्तुकलेचा इतिहास असलेली दमडी मशिद आदी धार्मिक, ऐतिहासिक महत्व असलेली स्थळे आपल्या शहरात आहेत. जवळच असलेले शनी शिंगणापूर, कानिफनाथांची समाधी असलेले मढी, मायंबा देवस्थान, वृद्धेश्वर, मोहटा देवी मंदिर, कोल्हारची रेणूका माता मंदिर, नेवासा येथील पैस खांब मंदिर, कोळगावचे बाबा, दत्तगढ देवस्थान, पारनेर येथील रांजण खळगे, प्रवरानगर येथील आशियातील पहिला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आदी अनेक सुंदर, ऐतिहासिक, वैशिष्ट्यपूर्ण वास्तू ,स्थळे अहमदनगर शहराच्या आसपास आहेत. हे खरोखरीच अगाध असून, एकेकाळी हे शहर निजामशहाचे राजधानीचे समृध्द शहर होते. कैरो, बगदाद या सुंदर देशांच्या तुलनेत आपल्या शहराची गणना केली जात असे, ही आपली ताकद होती. पण दुर्दैवाने इथल्या अनेक ऐतिहासिक महत्वाच्या वास्तू आज दुर्लक्षित असून, त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. काही वर्षात भुईकोट किल्ला कोसळला तर त्याचे कोणाला आश्चर्य वाटायला नको. भुईकोट किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी याच किल्ल्यात नजरकैदेत ठेवलेल्या स्वातंत्र्यलढ्यातील भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम अशा प्रमुख नेत्यांचे १९४२ ते ४५ या काळात वास्तव्य होते. छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांना याच किल्ल्यात ब्रिटिशांनी बंदिस्त करून ठेवले होते, येथेच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. यावरून येथील भुईकोट किल्ल्याचे किती पावित्र्य आहे, हे लक्षात येते. हा किल्ला केव्हा कोसळेल हे सांगता येत नाही. याची जपणूक व्हायला हवी. हा किल्ला केव्हाच राष्ट्रीय स्मारक व्हायला हवा, इतकी याची महती आहे. हा किल्ला त्याकाळी जमिनीवरील सर्वात मजबूत किल्ला, अशी याची ख्याती होती. दिल्लीच्या सम्राट अकबराने देखील हा किल्ला जिंकण्याचा चंग बांधला होता. या किल्ल्याचा इतिहास पाहता, येथील इतिहासाचे टप्पे पाहता हा किल्ला युनेस्कोच्या वारसा नामांकन यादीमध्ये यायला हवा, असे पर्यटन, पुरातत्व क्षेत्रात काम करणार्‍या तज्ञांचे, अभ्यासकांचे म्हणणे आहे. परंतु दुर्दैवाने किल्ला अजूनही पुरातत्व खात्याच्या ताब्यात नसल्यामुळे पुरातत्व खात्याच्यावतीने तेथे कोणतीही डागडुजी होऊ शकत नाही. किल्ल्याच्या बुरुजावर वाढलेली झाडे यामुळे येथील अनेक बुरुज खिळखिळी झाली असून, ते केव्हाही कोसळू शकतात. निदान संबंधित लष्करी अधिकार्‍यांना आपण विनंती केली तरी दोन दिवसात धोकादायक झाडे काढून किल्ल्याचा बचाव होऊ शकेल. येथील ऐतिहासिक, धार्मिक वास्तू येथे पर्यटकांना रस्ता, स्वच्छतागृह, चहा, खानपान, बसण्याची व्यवस्था, हस्तकलेच्या वस्तू, खेळणी विक्रीची व्यवस्था झाल्यास तरुणांना रोजगार निर्माण होऊ शकेल. पर्यटकांना नेण्यासाठी रिक्षा, टॅसी आदी सुविधा उत्पन्न होऊन तरुणांच्या हाताला काम मिळू शकते. या शहरात केंद्र सरकारचा पुरातत्व विभाग अस्तित्वात आहे का? अन् असला तरी त्याचे अस्तित्व काय आहे? या विभागातील कर्मचारी महिन्याला आपला पगार घेण्याव्यतिरिक्त काही करत नाहीत की, यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडलाय..? याची गांभीर्याने चौकशी व्हायला हवी. एक नगरकर म्हणून याची खूप खंत वाटते. सांस्कृतिक, पर्यटन क्षेत्रात काम करणार्‍या रसिक ग्रुपच्या माध्यमातून आम्ही येथील जाज्वल्य इतिहास जगासमोर आणण्यासाठी अनेक उपक्रम आयोजित केले आहेत. इथल्या दुर्लक्षित वास्तूंच्या जपणुकीसाठी शासन दरबारी देखील प्रयत्न केले आहेत. आपल्या शहराचे महत्व समजावे, शहराविषयी बालवयात अभिमान वाटावा, तो संस्कार रुजावा यासाठी हजारो बाल विद्यार्थ्यांना नगर दर्शन सहलीची भेट घडवून आणली असून, यातून मुलांना आपल्या शहराविषयी आत्मियता व अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. येथे दूरदृष्टीच्या, या भूमीवर प्रेम करणार्‍या, शहराचे ऐतिहासिक महत्व जाणणार्‍या, शहरांसाठी काही करु इच्छिणार्‍या नेत्यांची खरी गरज आहे. या वास्तू थकलेल्या डोळ्यांत प्राण आणून आपल्या संवर्धनासाठी त्यांची वाट पहात आहेत. म्हणूनच आम्हा नगरकरांना आपल्याकडून येथील पर्यटन विकासाच्या आशा आहेत. शहराच्या पर्यटन विकासासाठी येथील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी (केवळ सुशोभीकरण नव्हे) भरीव आर्थिक निधी केंद्र, तसेच राज्य सरकारकडून मिळवावा. त्याचप्रमाणे भुईकोट किल्ल्यास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून या शहराचा पर्यटन विकास करून अहमदनगरला जगाच्या पर्यटन नकाशावर आणावे. जर मनावर घेतले तर या शहराचा कायापालट होऊ शकतो. नगरकर आपले आयुष्यभर ऋणी राहतील, असेही शेवटी येलुलकर यांनी म्हटले आहे.