नगर मधील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातील टेबलच्या ड्रावरमध्ये ठेवलेली ३ लाखाची रोकड अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना सोमवारी (दि.८) सकाळी १०.३० ते दुपारी ३ या कालावधीत दिल्लीगेट परिसरात घडली. याबाबत गुलाब पांडुरंग कराळे (रा.वाकोडी, ता.नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कराळे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे दिल्लीगेट परिसरात तानवडे पॅथॉलॉजी लॅब जवळ समर्थ असोसिएटस् नावाचे कस्ट्रशनचे कार्यालय आहे. या कार्यालयातील टेबलच्या ड्रावरमध्ये त्यांनी तीन लाखाची रोकड ठेवलेली होती. दुपारी ३ च्या सुमारास ते रोकड घेण्यासाठी कार्यालयात गेले असता अज्ञात चोरट्याने ड्रावरचे लॉक तोडून सदरची रोकड चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या चोरीबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. रात्री उशिरा याबाबबत त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.क. ४५२, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.