थरारक पाठलाग करून दरोडेखोरांची टोळी नगरजवळ पकडली

0
66

नगर-सोलापूर महामार्गावर वाळुंज गावच्या शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेली दरोडेखोरांची टोळी पकडल्यानंतर त्यांच्या समवेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.

घातक हत्यारे घेवून दरोडा टाकण्याच्या तयारीत अंधारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.८) रात्री ९.४५ च्या सुमारास नगर-सोलापूर महामार्गावर वाळुंज गावच्या शिवारात असलेल्या पारगाव फाट्याजवळ थरारक पाठलाग करून पकडले आहे. या टोळीकडून दोन तलवारी, लोखंडी टामी, मिरची पुड, नायलॉन दोरी अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. पकडण्यात आलेल्या टोळीत साईनाथ तुकाराम पवार (वय २२), आकाश गोरख बर्डे (वय- २८), विशाल पोपट बर्डे (वय- १८), नवनाथ तुकाराम पवार (वय- २७), अमोल दुर्यो धन माळी (वय- १८), एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. कुरणवाडी, ता.राहुरी) यांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना सोमवारी (दि.८) रात्री गोपनीय माहिती मिळाली की, वाळुंज शिवारात काही दरोडेखोर घातक हत्यारे घेवून कुठे तरी दरोडा टाकण्याच्या तयारीत अंधारात दबा धरून बसलेले आहेत. ही माहिती मिळताच त्यांनी स.पो.नि. हेमंत थोरात, स.फौ. दत्तात्रय हिंगडे, पो.हे.कॉ. सुनिल चव्हाण, ज्ञानेश्वर शिंदे, बापूसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे, पो.ना. संदीप दरंदले, रविंद्र कर्डीले, पो. कॉ. सागर ससाणे, प्रमोद जाधव, चालक स.फौ. उमाकांत गावडे यांच्या पथकाला तातडीने कारवाईसाठी पाठविले. या पथकाने वाळुंज शिवारात धाव घेत पारगाव फाट्याजवळ दरोडेखोरांचा कानोसा घेतला असता तेथे काही जण अंधारात दबा धरून बसल्याचे दिसून आले. पोलिस पथकाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले. या पथकाने दरोडेखोरांचा पाठलाग करून सर्व ६ जणांना पकडले. त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या कडे दोन तलवारी, लोखंडी टामी, मिरची पुड, नायलॉन दोरी व काही मोबाईल असा ५८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला. पकडलेले सर्व आरोपी हे सराईत दरोडेखोर असून त्यांच्यावर या पूर्वी विविध पोलिस ठाण्यांत चोर्‍या, घरफोड्या व दरोड्यांचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत पो.हे.कॉ. ज्ञानेश्वर शिंदे यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ६ दरोडेखोरांच्या टोळी विरुद्ध भा.दं.वि.कलम ३९९, ४०२, आर्म अ‍ॅट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे करीत आहेत.