सीसीटीव्ही फुटेजमुळे लागला तपास; दानपेटीसह २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
नगर – शहरातील माळीवाडा भागातील ब्राम्हणगल्ली येथील शंकर बाबा सावली मठातील अंदाजे २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी रविवारी (दि.७) पहाटे चोरीला गेली होती. ही चोरी करणारा चोरटा कोतवाली पोलिसांनी १२ तासांत जेरबंद केला आहे. त्याच्याकडून दानपेटीसह २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रोहीदास उर्फ रावश्या लक्ष्मण पलाटे (वय ३८, रा.मिरी म ाका, ता. नेवासा) असे या चोरट्याचे नाव आहे. ब्राम्हण गल्ली, माळीवाडा येथील शंकर बाबा सावली मठातील अंदाजे २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी रविवारी (दि.७) पहाटे पावणे चारच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती.
याबाबत कमलेश लक्ष्मण जंजाळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कोतवाली पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना कोतवाली पोलीसांनी मंदीरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा करणारा आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसुन आल्याने त्याचा अभ्यास करता चोरी करणारा इसम हा रावश्या असुन तो (माका ता. नेवासा) येथील राहणारा असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी तात्काळ सदरील ठिकाणी जावुन शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास प्राप्त सीसीटिव्ही पुराव्यांच्या आधारे अधिक विश्वासात घेवुन चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.
तसेच चोरलेली दानपेटी ही त्याने गांधी मैदानात एका पडया खोलीत लपवुन ठेवल्याची माहीती दिल्याने सदर ठिकाणावरुन चोरी झालेली दानपेटी व त्या मधील र क्कम हस्तगत करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रविंद्र पिंगळे, स.पो.नि. विश्वास भान्सी, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, ए. पी इनामदार, शाहीद शेख, सलीम शेख, अतुल काजळे, अभय कदम, अमोल गाढे, संदिप थोरात, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, इसराईल पठाण, मोबाईल सेलचे राहुल गुंडू, नितीन शिंदे आदींनी केली आहे.