दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर सरमिसळ करण्याचा निर्णय रद्द करावा

0
181

राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेलचे पुणे बोर्डाच्या अध्यक्षांना निवेदन, तो निर्णय विद्यार्थी, पालक व शिक्षकांना गोंधळात टाकणार

दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर सरमिसळ करण्याचा निर्णय रद्द करावा, या मागणीचे निवेदन पुणे बोर्डाच्या अध्यक्षा मंजुषा मिजगर यांना देताना प्रा.माणिकराव विधाते, वैभव ढाकणे, औदुंबर उकिर्डे आदी.

नगर – दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची सरमिसळ करणे विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या दृष्टीने त्रासदायी आणि गोंधळ निर्माण करणारा असल्याने हा निर्णय रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेलच्या वतीने पुणे बोर्डाच्या अध्यक्षा मंजुषा मिजगर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. न्यु आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात पुणे विभागीय मंडळातर्फे जिल्ह्यातील मुख्याध्यापक व प्राचार्य यांची सहविचार सभा मिजगर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी सदर निवेदन देऊन मिजगर यांचे लक्ष वेधले. याप्रसंगी सचिव औदुंबर उकिर्डे, शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस, सहसचिव राऊत आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी ज्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा अधिक परीक्षा केंद्र आहेत, तेथे विद्यार्थ्यांची आसन व्यवस्थेत बदल करून सरमिसळ करण्याचा विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा निर्णय घेत आहे. फक्त पुणे विभागांमध्ये आणि त्यातच फक्त शहरांमध्ये हा बदल करण्याचा घाट पुणे विभागीय मंडळ घेत आहे. या गोष्टीमुळे शहरांमध्ये शहरांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवनावर मोठा परिणाम होणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी सेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवेश घेतानाच विद्यार्थी सोयीच्या शाळा महाविद्यालयात प्रवेश घेत असतो. शिक्षण घेत असताना तो परिसर त्याच्या परिचयाचा झालेला असतो. परंतु यावेळी परीक्षा केंद्रात अपरिचित ठिकाणी परीक्षेला जावे लागल्याच्या कल्पनेने विद्यार्थी व पालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम त्यांच्या परीक्षेवर होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. दूरवरचे केंद्र असल्याने प्रत्येक पालक आपल्या पाल्याला परीक्षा केंद्रावर सोडू शकत नाही. परीक्षा कालावधीत अनेक वेळा लग्नसराई किंवा अन्य तत्सम गर्दी निर्माण होणार्‍या कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण होणार आहे. तसेच काही कनिष्ठ महाविद्यालयाचा परिसर हा मोठा असतो. तेथे एकापेक्षा जास्त इमारतीत बैठक व्यवस्था केलेली असते. बारावी बोर्डाच्या परीक्षेला विषयांची विविधता असल्याने इयत्ता बारावीची बैठक व्यवस्था प्रत्येक पेपरला बदलली जाते. त्यामुळे परीक्षा हॉल सापडणे यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांची धावपळ होणार असून, त्याचा मानसिक ताण विद्यार्थ्यांवर येणार्‍याची शयता आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे नियम समान असावे, या निर्णयामुळे ठराविक विद्यार्थ्यांचे केंद्र बदलणार असल्याने यामध्ये भेदभाव निर्माण होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा निर्णय रद्द न केल्यास आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर स्वप्निल भोरे, निलेश कदम, तुषार भोस, सचिन अजिबे, ओमकार आव्हाड यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.