नगर – नगर येथील जिल्हा न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदरची घटना मंगळवारी (दि.२) दुपारी चार वाजता घडली. असिफ विलायतखान पठाण (रा. नेवासा) असे गुन्हा दाखल झालेल्या व्येीचे नाव आहे. याबाबत चौरंग गोरक्षनाथ लष्करे (वय ३१, रा. नेवासा, हल्ली रा. अकोले) यांनी फिर्याद दिली आहे. नेवासा येथील खूनाच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार सोपान गाडे, चौरंग लष्करे यांना जामीन मंजूर झाला आहे. यासंदर्भात येथील जिल्हा न्यायालयात सुनावणीही सुरू असून मंगळवारी सुनावणीसाठी सोपान गाडे, चौरंग लष्करे हजर होते. तेथे असिफ पठाण हा देखील आला होता. त्याने चौरंग लष्करे याला जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी लष्करे याने भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लष्करे याला धमकी देताना पठाण म्हणाला, ‘तुम्हारा जामीन रद्द करके तुमको वापस जेल में डालने वाला हू, जामीन रद्द नही हुआ तो, तुम्हे जानसे मारने वाला हू’, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान यानंतर लष्करे यांनी भिंगार पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी पठाण विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निसार शेख करीत आहेत.