नागरिकांची मोफत सर्व रोग तपासणी
नगर – मंगलगेट येथील वर्चस्व ग्रुपने सर्वसामान्यांना आधार देऊन सामाजिक चळवळीत आपले वर्चस्व सिध्द केले आहे. नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्त्वाची बनली असून, त्या दृष्टीने राबविण्यात आलेले शिबिर कौतुकास्पद आहे. धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. मात्र वेळोवेळी तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येतो. महागाईच्या काळात सर्वसामान्यांची सोय होण्यासाठी आरोग्य शिबिर गरजेचे बनले असल्याचे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले. वर्चस्व ग्रुपच्या वतीने शहरातील वंजार गल्ली येथे अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल व श्री दत्त लीला हॉस्पिटल यांच्या सहकार्याने नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले. तर नोंदणी झालेल्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी डॉ. शशिकांत फाटके, वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तडकर, परेश बजाज, संतोष मेहेत्रे, गणेश माने, रमेश सानप, रविंदरसिंग नारंग, उमेश झेंडे, शरद मुर्तडकर, प्रमोद भिंगारे, निलेश खांडरे, बाली जोशी, मयूर मैड, सुनिल भिंगारे, धीरज पोखरणा आदींसह परिसरातील नागरिक व युवक उपस्थित होते. पुढे आ. जगताप म्हणाले की, वर्चस्व ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर सातत्याने धार्मिक व सामाजिक उपक्रम सुरु आहे. कोरोना काळातही ग्रुपच्या माध्यमातून गरजूंना किराणा साहित्याची मदत देण्यात आली. प्रभागातील नागरिकांना देवदर्शन यात्रा घडविण्यात आली. सर्वसामान्यांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारची कल्याणकारी योजना असलेल्या आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी करुन नागरिकांना त्याचे वाटप करण्यात आले. नागरिकांना केंद्रबिंदू ठेऊन ग्रुपच्या माध्यमातून सुरु असलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. सागर मुर्तडकर म्हणाले की, समाज निरोगी करण्यासाठी आरोग्य चळवळ उभी करण्याची गरज असून, समाजात आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आरोग्य सुविधांचा खर्च पेलवत नाही. त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी व त्यांच्या सोयीसाठी या शिबिराचे आयोजन केले गेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर एखाद्या कुटुंबातील सदस्यावर गंभीर आजाराचा धोका निर्माण झाल्यास अशा परिस्थितीमध्ये आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून त्यांना मोफत उपचार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शिबिरात सांधेदुखी, हृदयरोग, दंत रोग व नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद लाभला. शिबिरात डॉ. शिफा तांबोळी, डॉ. पूजा गायकवाड, डॉ. प्रशांत गोनाडे, डॉ. जिलेश, डॉ. किशोर कवडे, डॉ. तेजस हिवाळे, डॉ. अजय ढापसे, योगेश भोसले यांनी रुग्णांची तपासणी केली. नाव नोंदणीसाठी सकाळ पासूनच रांगा लागल्या होत्या. नागरिकांची आरोग्य तपसाणी करुन गरजूंना मोफत औषधे देखील देण्यात आले. शिबिरात सहभागी झालेल्यांना अल्प दरात चष्म्याचे वाटप करण्यात आले. गरजेनुसार एस-रे, ईसीजी इतर उपचार व विविध तपासण्यांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली होती. आ. जगताप यांच्या हस्ते मागील शिबिरामध्ये नोंदणी केलेल्या ५ लाखापर्यंत मोफत उपचार असलेल्या केंद्र सरकारच्या पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. तर वर्चस्व ग्रुपच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी तुषार गायकवाड, शकिल देशमुख, आकाश शहाणे, संपत चाबुकस्वार, परिचारिका अंजली बाबर, शुभांगी बुलाखे, मिरा पांडुळे, सारिका वाकडे यांनी परिश्रम घेतले.