नगर – दारू व्यसन मुक्ती केंद्र सुरू करण्यासाठी ओळखीच्या महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने व तिच्या नावे चार लाख रूपये कर्ज घेऊन ते परत न करता तिची फसवणूक केली. सुष्मा सुरेश सोनवणे (वय ४३ रा. संभाजी कॉलनी, रेल्वेस्टेशन, नगर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश राधाकिसन राऊत (रा. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुमारे दीड वर्षांपूर्वी नगरमधील रेल्वेस्टेशन परिसरातील दारू व्यसन मुक्ती केंद्रावर कामाला असताना मजुर ठेकेदार गणेश राधाकिसन राऊत यांच्यासोबत ओळख झाली होती. राऊत याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून स्वत:चे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यासाठी मदत करण्याची मागणी केली. फिर्यादीने त्याला त्यांच्याकडील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने दिले होते. ते दागिने घेतल्यानंतर दुप्पटीने दागिने करून देण्याचे आश्वासन त्याने दिले होते. सोन्याचे दागिने मोडून व्यसन मुक्ती केंद्राचे लायन्सस काढले असून जागा भाड्याने घेण्यासाठी तुझ्या नावावर कर्ज घेऊन देण्याची मागणी राऊत याने फिर्यादीकडे केली. त्यावेळी फिर्यादीने त्यांच्या नावे बंधन बँकेचे चार लाख रूपये कर्ज घेऊन त्याला रोख स्वरूपात चार लाख रूपये दिले. त्यानंतर फिर्यादीने त्याच्याकडे दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने व पैशाची मागणी केली असता त्याने ते परत देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.