कॅन्डल रॅली मधून प्रत्येकाचे जीवनमान प्रकाशमय होवो

0
122

रेव्ह.अभिजित तुपसुंदरे यांचे प्रतिपादन; हातमपुरा येथील अहमदनगर पहिली मंडळी चर्चतर्फे कॅन्डल रॅली

हातमपुरा येथील ऐतिहासिक अहमदनगर पहिली मंडळी चर्चच्यावतीने नाताळ व नवीन वर्षानिमित्त ख्रिस्ती बांधवांच्यावतीने कॅन्डल रॅली काढण्यात आली. या रॅलीत ख्रिस्त बंधू-भगिनी, लहान मुले सहभागी झाले होते.

नगर – बायबलमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांनी जी शिकवण दिली आहे, त्या शिकवणीनुसार तुमचा प्रकाश लोकापर्यंत असा पडू द्या की, तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गातील देवाने तुमचा गौरव करावेत. प्रभु येशू ख्रिस्ताच्या शिकवणीला अनुसरुन आम्ही सर्व ख्रिस्ती बांधवांनी शहरातून प्रकाशाचा संदेश लोकांना दिला आहे. नाताळ निमित्त चर्चमध्ये आज विशेष भक्तीचे आयोजन करण्यात येऊन शहरातून कॅन्डल रॅली काढण्यात आला आहे. सर्वांना प्रकाशाच्या शुभेच्छा, येणारे नवीन वर्ष सर्वांना प्रकाशमय व आशिर्वादीत होवो, अशी सदिच्छा रेव्ह. अभिजित तुपसुंदरे यांनी केली. हातमपुरा येथील ऐतिहासिक अहमदनगर पहिली मंडळी नाशिक धर्मप्रांत (सी.एन.आय.) चर्चच्यावतीने नाताळ व नवीन वर्षानिमित्त चर्च येथून ख्रिस्ती बांधवांच्यावतीने कॅन्डल रॅली काढण्यात आला. या रॅलीत ख्रिस्त बंधू-भगिनी, लहान मुले सहभागी झाले होते. ही कॅन्डल रॅली हातमपुरा येथील चर्चपासून निघून भंडारी कॉर्नर, जुना कापड बाजार, भिंगारवाला चौक, माणिकचौक, चाँद सुलतांना हायस्कूल, बुरुडगल्ली, धरती चौक मार्गे पुन्हा हातमपुरा येथे चर्चमध्ये समारोप करण्यात आला. यावेळी प्रत्येकाच्या हातात मेणबत्ती घेऊन ‘हमारा मसिहा जिंदा है..’ अशा प्रभु येशू ख्रिस्तांच्या जयघोषात ही रॅली उत्साहात झाली. यानंतर चर्चामध्ये प्रार्थना करण्यात आली.