एस.टी.बसमध्ये चढताना वृद्धाचे पाकिट चोरले

0
118

नगर – एस.टी. बसमध्ये चढताना वृध्द व्यक्तीच्या खिशातील पाकिट चोरट्याने लांबविले. त्यात ५ हजार ५०० रुपयांची रोकड होती. शनिवारी (दि. ३०) नगर शहरातील पुणे बस स्थानकावर ही घटना घडली. अतुल हरकचंद कोठारी (वय ५५, रा. एकता कॉलनी, केडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांना शनिवारी सकाळी पत्नीसह देवगड (ता. नेवासा) येथे देव दर्शनासाठी जायचे असल्याने ते साडेदहाच्या सुमारास पुणे बसस्थानकावर आले. सव्वा अकराच्या सुमारास पुणे-छत्रपती संभाजीनगर बस आल्याने ते बसमध्ये चढत असताना खूप गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत फिर्यादीच्या खिशातील पाकिट चोरट्याने चोरले. काही वेळातच सदरचा प्रकार फिर्यादीच्या लक्षात आला. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जावून फिर्याद दिली आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी चोरट्याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.