नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे. यानंतर सध्या बँकेवर सहकार विभागाने प्रशासक म्हणून गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी थकीत कर्ज वसुलीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. बँकेत अनेक ठेवीदार, खातेदारांचे पैसे अडकलेले आहेत. ठेवी परत मिळवण्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला जात असून यादरम्यान सर्व ठेवीदार, खातेदारांनी आपापल्या शाखेत जाऊन ’केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी स्वतःचे आधार कार्ड, पॅनकार्ड, फोटो तसेच बँकेने मागितलेले कागदपत्रे जमा करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन बँकेचे जागृत सभासद राजेंद्र चोपडा यांनी केले आहे. नगर अर्बन बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाल्याने अनेक ठेवीदार, खातेदार त्यांच्या हक्काच्या ठेवी परत मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सर्व खातेदार, ठेवीदारांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या खात्यांवरील के.वाय. सी. अपुर्ण असेल त्या खात्यांमधील रक्कम परत मिळणेस अडचणी निर्माण होतील. त्यायामुळे संबंधितांनी आपले खाते असलेल्या शाखेत जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन राजेंद्र चोपडा यांनी केले आहे