नगर – शेतकर्याचे बंद असलेले घर भरदिवसा फोडून घरातील कपाटात ठेवलेले ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नगर तालुयातील पारगाव मौला शिवारात गुरुवारी (दि.२८) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत वैजयंता चंद्रभान नेटके (वय ४५, रा.खेडकर वस्ती, पारगाव मौला शिवार, ता. नगर) यांनी सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी नेटके या शेतकरी असून त्यांचे पारगाव मौला शिवारात खेडकर वस्ती येथे घर आहे. त्या व त्यांचे कुटुंबीय गुरुवारी (दि.२८) सकाळी १० च्या सुमारास घराला कुलूप लावून कामानिमित्त नगरला गेले होते. सायंकाळी ५ च्या सुमारास पुन्हा घरी परतल्यावर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता सर्वत्र उचकापाचक केलेली दिसून आली. त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कपाटात ठेवलेले ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी घरात चोरी करून दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी नगर तालुका पोलिसांना याबाबत माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक रणजीत मारग यांनी पोलिस पथकासह जावून पाहणी केली. ठसे तज्ञ ही बोलावण्यात आले. त्यांनी पाहणी करून चोरट्यांचे ठसे मिळविण्याचा प्रयत्न केला. याबाबत वैजयंता नेटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.हे.कॉ.रमेश गांगर्डे हे करीत आहेत.