कायनेटिक चौकातील बंद सिग्नल सुरू करण्याची काँग्रेसची मागणी
मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील प्रभाग ११ मधील नागरिकांच्या वतीने शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला यांनी दुचाकीवरून आयुक्त आपला दारी कार्यक्रमांतर्गत प्रभाग भेटीचे निमंत्रण दिले. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.
नगर – रस्ते, स्ट्रीट लाईट, सांडपाणी अशा मूलभूत प्रश्नांनी गंभीर रूप धारण केले आहे. कार्यकर्ते प्रभागातील नागरिकांसमवेत आपल्याला प्रभागाची सफर घडवतील. आमच्या दुचाकीवर बसून खड्ड्यांमधून प्रवास करताना किती त्रास होतो याचा अनुभव तुम्ही ही स्वतः घ्या, असे लेखी निमंत्रण पत्रच शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अलतमश जरीवाला यांनी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना देत प्रभाग भेटीसाठी निमंत्रित केले आहे. नगरय्पुणे रोडवरील सततची वाहतूक कोंडी, अपघातांची मालिका रोखण्यासाठी कायनेटिक चौकातील बंद सिग्नल तात्काळ सुरू करा, अशी मागणी यावेळी किरण काळे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. यावेळी प्रभाग ११ मधील समस्यांसह, बंद सिग्नल, अन्य समस्यांबद्दल देखील आयुक्तांचे लक्ष वेधले. यावेळी दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, फैयाज शेख, विलास उबाळे, अलतमश जरीवाला, मीनाज सय्यद, जरीना पठाण, आकाश अल्हाट, अशोक जावळे, आनंद जवंजाळ, विकास भिंगारदिवे, चंद्रकांत उजागरे, शंकर आव्हाड, सुधीर लांडगे, अभिनय गायकवाड, स्वप्निल सातव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. काळे म्हणाले, पूर्वी कायनेटिक चौकात असणारे सर्कलचे क्षेत्र मोठे होते. त्यामुळे अपुरी जागा होती. अनेक वेळा वाहतूक कोंडी व्हायची. आता ते हटवण्यात आले आहे. मात्र तेथे असणारी सिग्नलची व्यवस्था ही कार्यान्वित नसल्यामुळे आजही त्या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. रेल्वे पुलावरून वाहने वेगात खाली येत असतात. तसेच केडगाव वरून नगरकडे येणार्या नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. यामध्ये दुचाकी स्वार देखील असतात. अनेक वेळेला या ठिकाणी अपघात घडतात. हे टाळायचे असेल तर मनपाने तात्काळ सिग्नल कार्यान्वित करावा. अन्यथा काँग्रेस यासाठी आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला. जरीवाला म्हणाले, प्रभागात बहुतांशी ठिकाणी नळाला येणार्या पिण्याच्या पाण्याची दुर्गंधी येते. पाणी मैला मिश्रित असते. आयुक्तांनी स्वतः नागरिकांच्या घरी भेट देत याची पाहणी करावी. जे पाणी नागरिक पितात ते पाणी आयुक्तांनी स्वतः पिऊन दाखवावे. मग त्यांना लक्षात येईल की किती कठीण परिस्थितीतून नगरकर जगत आहेत. पाच वर्ष नगरसेवक राहिलेला एकही प्रतिनिधी नागरिकांना तोंड दाखवायला तयार नाही. अस्वच्छ पाण्यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रभागात स्ट्रीट लाईट कोट्यावधी खर्च करून बसवण्यात आले. मात्र बाजारपेठेसह रहिवासी भाग असून देखील प्रभाग मात्र अंधारातच आहे. मग एवढा खर्च करून देखील अंधारात राहणार असेल तर जनतेचा पैसा गेला कुठे असा सवाल जरीवाला यांनी विचारला आहे. नगरसेवकांच्या कार्यकाळ संपुष्टात आला आहे. मनपात प्रशासक राज आले आहे. आता आयुक्त राजकीय जोखडातून मुक्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेसच्या निमंत्रणानंतर आयुक्त स्वतः आयुक्त आपल्या दारी कार्यक्रम राबवणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आयुक्तांनी रस्त्यावर उतरत नगरकरांचे प्रश्न सोडवले तर त्याचे नगरकर आणि काँग्रेस स्वागतच करेल असे किरण काळे यांनी म्हटले आहे.