अनोळखी व्यक्तीला ओटीपी सांगितला अन बँक खात्यातून सव्वा तीन लाख झाले गायब ; नगरमधील महिलेची झाली ऑनलाईन फसवणूक

0
167

क्रेडिट कार्डचे रिवार्ड पॉईंट बँक खात्यावर जमा करण्यासाठी आलेल्या बनावट कॉलला प्रतिसाद दिल्याने महिलेच्या बँक खात्यातील ३ लाख २९ हजार ८०० रूपये काढून घेतल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नगरय्कल्याण रस्त्यावरील ड्रिम सिटी परिसरात राहणार्‍या महिलेने बुधवारी (दि.२७) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचे ऍसीस बँकेच्या चितळे रस्त्यावरील शाखेत खाते आहे. त्या बँकेचे क्रेडिट कार्ड देखील वापरतात. त्यांना मंगळवारी (दि.२६) दुपारी साडे तीनच्या सुमारास एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला. त्या व्यक्तीने ऍसीस बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे क्रेडिट कार्डचे रिवार्ड पॉईंट हे तुमच्या खात्यावर जमा होतील अशी बतावणी केली. फिर्यादी यांनी त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्याने फिर्यादीच्या मोबाईलवर पाठविलेला ओटीपी मागितला असता फिर्यादीने त्याला ओटीपी सांगितला. त्या व्यक्तीने फिर्यादीच्या व्हॉट्सअ‍ॅपला एक लिंक पाठविली व त्यावरून ऍसीस बँकेचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर फोन बंद झाला. फिर्यादीने त्यावर पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क झाला नाही. काही वेळाने फिर्यादीच्या मोबाईलवर बँक खात्यातील पैसे डेबिट झाल्याचे मेसेज आले. एकुण ३ लाख २९ हजार ८०० रूपये त्या व्यक्तीने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादीने पतीसह ऍसीस बँकेच्या चितळे रस्त्यावरील शाखेत धाव घेतली. तेथे चौकशी केली असता असा कोणताही फोन आम्ही केला नसल्याची माहिती बँकेतून देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बुधवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.