दोन दिवसात नागापूर गावठाणपासून ते डॉन बॉस्कोपर्यंत हद्दनिश्चिती पूर्ण; शुक्रवार पासून खांब उभे करण्याचे काम सुरू करणार
नगर – शहरातून वाहणार्या सीना नदीपात्राच्या हद्दनिश्चितीचे काम बुधवार (दि. २७) पासून सुरू झाले आहे. महापालिका हद्दीतील नागापूर गावठाण येथून या हद्दनिश्चितीला सुरुवात होऊन, गुरुवारी (दि. २८) डॉन बॉस्को विद्यालयापर्यंत हद्दनिश्चितीच्या खुणा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सीना नदीपात्रालगत असलेल्या ७ गावे आणि उपनगरातील मालमत्ताधारकांना भूमिअभिलेख कार्यालयामार्फत हद्दनिश्चितीसंदर्भात यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या. दि. २७ डिसेंबरपासून प्रत्यक्ष सीनापात्राच्या हद्दनिश्चितीचे काम सुरू झाले असून, यात महापालिकेचा अतिक्रमण विभाग, नगररचना विभाग आणि भूमिअभिलेख कार्यालयाचे पथक सहभागी झाले आहे. भूमिअभिलेख कार्यालयाकडून डिजिटल रोव्हर मशिनने मोजणी करण्यात येत आहे. या रोव्हरच्या मॅपनुसार नदीच्या दोन्ही बाजूने हद्दनिश्चितीच्या खुणा करण्यात येत आहेत. दोन दिवसात डॉन बॉस्कोपर्यंत ३० ते ३५ खुणा करण्यात आल्या आहेत. प्रथम सीना नदीपात्राची मोजणी करण्यात येत असून, दिलेल्या खुणेवर शुक्रवार (दि. २९) पासून खांब बसविण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रिझवान शेख यांनी दिली. सीना नदीपात्राची हद्द निश्चित झाल्यानंतर त्याचे नकाशे भूमिअभिलेख कार्यालयाकडून महापालिकेला देण्यात येणार आहेत. सध्या केवळ हद्दनिश्चितीचेच काम सुरू असून, पात्राभोवती झालेल्या अतिक्रमणाबाबत तसेच खाजगी मालमत्ताधारकांच्या मालमत्तांसंदर्भात प्रशासकीय पातळीवर नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हद्दनिश्चिती झाल्यानंतर सीना सुशोभिकरणासह पूरनियंत्रण रेषा निश्चित करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. या मोहिमेत महापालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख आदित्य बल्लाळ, नगररचना विभागाचे अभियंता जितेंद्र शेळके, रिजवान शेख, गणेश यातम, संजय चव्हाण, खलील पठाण, बाळासाहेब व्यापारी, संदीप फाळके, सुरेश भुतकर, सुरज दहिहंडे, मोहन ढवळे आदींसह भूसंपादन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यांच्यासह भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले आहेत. या कामावर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.