नगर – एका महिलेच्या नावे असलेल्या मिळकतीवर अगोदर एका बँकेचे कर्ज घेतलेले असताना त्या मिळकतीच्या ७/१२ उतार्यावर कामगार तलाठ्याने कुठलाही बोजा न चढवता संगनमत करून बोजा नसलेला उतारा दिला. त्या उतार्याच्या आधारे दुसर्या एकाने संगमनेर मर्चंट बँकेकडून ७ लाखांचे कर्ज घेवून बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघाजणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संगमनेर मर्चंट बँकेचे उप व्यवस्थापक विलय दयाकिशन बजाज (रा. गोविंद नगर, संगमनेर) यांनी अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उंचखडक, अकोले येथील सर्व्हे नं.२३/६ येथील मिळकत सत्यभामा मंडलिक या महिलेच्या नावावर आहे. या मिळकतीवर आरोपी प्रवीण विलासराव देशमुख (रा. नवलेवाडी, ता. अकोले) याने बँक ऑफ इंडियाच्या लोअर परेल मुंबई शाखेत कर्ज घेतले होते. मात्र उंच खडक येथील कामगार तलाठी एस.बी.मांढरे याने या कर्जाबाबत कुठलीही नोंद सदर मिळकतीच्या ७/१२ उतार्यावर न करता बोजा नसलेला उतारा दुसरा आरोपी किशोर धोंडीबा मंडलिक याला दिला. त्याने या उतार्याच्या आधारे संगमनेर मर्चंट बँकेतून ७ लाखांचे कर्ज घेतले. सदर कर्ज मंजूर झाल्यानंतर फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापनाने बँकेचे उप व्यवस्थापक विलय दयाकिशन बजाज यांना प्राधिकृत केल्याने त्यांनी अकोले पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी प्रवीण विलासराव देशमुख, किशोर धोंडीबा मंडलिक व कामगार तलाठी एस. बी. मांढरे या तिघांच्या विरोधात भा.दं. वि.कलम ४२०, ४०६, ४६५, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.