पेट्रोल पंपावर सहा जणांकडून दगडफेक, दोघे कर्मचारी जखमी

0
61

नगर – गाडीत पेट्रोल टाका, पैसे नंतर देतो, असे म्हणून सहा जणांच्या टोळयाने कल्याण रस्त्यावरील ठाणगे पेट्रोलपंपावर मंगळवारी (दि. २६) दुपारी गोंधळ घातला. पंपावरील कर्मचार्‍यांवर दगडफेक केली. याप्रकरणी कर्मचारी देवेंद्र विनोद शेटे (वय २२ रा. तोफखाना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी देवेंद्र शेटे हे मंगळवारी दुपारी ज्ञानेश्वर अंबादास ठाणगे यांच्या कल्याण रस्त्यावरील भारत पेट्रोलपंपावर ड्युटीला असताना दोन दुचाकीवरून सहा अनोळखी इसम पंपावर आले. त्यांनी शेटे यांना गाडीत पेट्रोल टाकण्यास सांगितले. तू आमच्या गाडीत पेट्रोल टाक, आम्ही नंतर पैसे देतो, असे म्हणून दमदाटी केली. पंपाचे मालक ज्ञानेश्वर ठाणगे तेथे आले व त्यांनी त्या सहा जणांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या सहा जणांनी पंपावर दगडफेक केली. या दगडफेकीत कर्मचारी शेटे व दुसरे कर्मचारी संतोष भगवंत दरेकर जखमी झाले आहेत. ६ जणांच्या विरुद्ध भा.दं.वि.क. ३२४, ३२३, ३३६, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.