तत्कालीन चेअरमन, संचालकांच्या घरासमोर करणार ‘थाळीनाद’
नगर – नगर अर्बन बँकेची लूट करणार्यांना तसेच बँक बंद पाडणार्यांना शिक्षा व्हावी, यासाठी बँक बचाव कृती समितीच्यावतीने विविध आंदोलने हाती घेण्यात येणार आहेत. कारवाईसाठी पोलिस प्रशासनावर दबाव वाढविण्याच्या दृष्टीने बुधवारी (दि. ३ जानेवारी) स्टेशन रस्त्यावर वर्धमान प्लायवूड दुकानासमोर सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे डी. एम. कुलकर्णी यांनी दिली आहे. नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना ठेवीच्या रकमा परत मिळाव्यात तसेच बोगस कर्जवाटप करून बँकेतील रकमांचा अपहार करणार्या बँक लुटारूंना शिक्षा व्हावी, यासाठी बँक बचाव समितीच्यावतीने ८-१० दिवसांपूर्वीच जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र दिले आहे. तथापि अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय समितीने घेतलेला आहे. त्यानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री नगर दौर्यावर असताना त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना ठेवीदारांच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे. बँकेचे तत्कालीन चेअरमन, त्यांचे वारस संचालक व विद्यमान संचालक यांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन करून घोषणा देण्यात येणार आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून पोलिस प्रशासनावर दबाव आणण्याचा समितीचा मानस आहे. या आंदोलनापैकी ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात ठेवीदारांनी व सभासदांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे डी. एम. कुलकर्णी यांनी केले आहे.