भूमिपुत्रांना रोजगार न मिळाल्यास जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात उपोषण

0
46

 

नगर – अहमदनगर जिल्ह्यात एमआयडीसीची स्थापना होऊन अनेक दशके झाली आहेत. जिल्ह्यात नवनवीन गुंतवणूकदार येत आहेत. सुपा एमआयडीसीसारखी राज्यात लक्ष वेधणारी आणि परदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी एमआयडीसी जिल्ह्यात आहे. पण या सर्व ठिकाणी अजूनही भूमिपुत्रांना न्याय मिळाला नाही. जिल्ह्यातील प्रत्येक कंपनीमध्ये सत्तर ते ऐशी टक्के मजूर परप्रांतीय आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कंपनी प्रशासनाला सक्त ताकीद द्यावी आणि येथील भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार मिळावा अशी मागणी शिवसेना पारनेर तालुका उपप्रमुख साहेबराव खरमाळे यांनी केली आहे. लवकरच या सर्व विषयांवर लक्ष वेधण्यासाठी समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेऊन आपली आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे.

जिल्ह्यातील भूमिपुत्रांना न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. नुकतेच खासदार सुजय विखे यांनी तालुयात काही नवीन एमआयडीसी मंजूर केल्या खर्‍या पण या एमआयडीसीचा फायदा आपल्या मराठी माणसाला किती होतो, याचीही शहानिशा खासदारांनी करावी, असा सल्ला खरमाळे यांनी दिला आहे. नगर जिल्ह्यातील अनेक एमआयडीसीमधून जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधीना आणि त्यांच्या चेल्या चपाट्याना मलिदा मिळत असल्याने सर्व जण या विषयावर ’तेरी भी चूप और मेरी भी चूप’ या भूमिकेत पाहायला मिळतात, असे खरमाळे यांनी म्हटले आहे.