वाढत्या तणावामुळे विस्मरणाला बळ

तणावपूर्ण जीवन, स्मृतिभ्रंश आणि त्यातून येणार्‍या अल्झायमर्स या आजाराचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे तणावामागील कारणं दूर करणं आणि तणावाचं व्यवस्थापन हा विस्मरणाचा आजार दूर ठेवण्याचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र तणाव सहन करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला स्मृतिभ्रंशाचा किंवा विस्मरणाचा त्रास होतोच असंही नाही. त्यामुळे तणाव आणि विस्मरण यांचा परस्परसंबंध लक्षात घेणं आणि त्यांचं व्यवस्थापन करणं अपरिहार्य आहे.

अलीकडे धावपळीच्या आयुष्यामुळे निवांतपणा, विश्रांती, स्वतःसाठी वेळ काढणं या बाबी दुर्मीळ बनत चालल्या आहेत. त्यामुळेच दगदग आणि ताणतणाव वाढून पूर्वी तरुणवयात न आढळणारे मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे शारीरिक आजार आता सरसकट होताना दिसत आहेत. शिवाय प्रौढ व्यक्तींमध्ये स्मृतिभ्रंश किंवा विस्मरण आणि कालांतरानं अल्झायमर्सच्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. योग्य आहार- विहाराचा अभाव याला कारणीभूत आहे. त्यामुळे लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येकजणच आत्यंतिक तणावाचा बळी ठरत असल्याचं दिसत आहे. मुलं आणि तरुणांच्या आत्महत्या तसंच कुटुंबासह आत्महत्या करणार्‍या लोकांचं दिवसेंदिवस वाढत चाललेलं प्रमाण यामुळेही वाढत्या ताणतणावाकडे लक्ष वेधलं जातं.

कौटुंबीक, कार्यालयीन आणि सामाजिक पातळीवरही सर्वत्र मोठ्या प्रमाणात तणाव वाढत चालल्याचं दिसतं. वाढते खर्च, वाढत्या महागाईला तोंड देताना उडणारी त्रेधातिरपीट, पती-पत्नीचं न पटणं आणि या सर्वांमधून निर्माण झालेलं कौटुंबीक अस्वास्थ्य यामुळे कौटुंबीक आयुष्यात तणाव वाढत चालले आहेत. घटस्फोटांचं वाढतं प्रमाण याचं द्योतक आहे. कार्यालयीन जीवनात सहकार्‍यांशी स्पर्धा, सततचं अस्थैर्य, केव्हाही काढून टाकलं जाण्याची टांगती तलवार, सुट्ट्या कमी मिळणं किंवा न मिळणं, साप्ताहिक सुट्ट्याच नसणं, बदलीची धास्ती अशा अनेक कारणांमुळे प्रचंड तणाव निर्माण होतात. यातही महिलांमध्ये घर आणि कार्यालयीन काम यामुळे स्वतःकडे लक्ष देण्यास बिलकूल वेळ नसणं, प्रचंड कामामुळे होणारी चिडचिड, मुलांकडे व्यवस्थित लक्ष दिलं जात नसल्यामुळे येणारं अपराधीपण यांची भर पडते. ज्येष्ठ नागरिकांना तर हल्लीच्या स्वतंत्र, लहान कुटुंबांच्या जमान्यात मोठा एकाकीपणा जाणवतो. पूर्वीप्रमाणे प्रौढ समवयस्क लोक घरात नसल्याने जोडीदाराचा मृत्यू झाला असेल तर त्यांना प्रचंड एकाकीपणा जाणवतो. वृद्धत्वाच्या समस्यांमुळे आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव त्यांच्या मनात घर करून राहते. साहजिकच यातून बदलत्या परिस्थितीत मुलांच्या संसारात तडजोड करत जगताना त्यांच्यावर मोठा ताण येतो. या सर्व परिस्थितीत प्रत्येकावर मोठ्या प्रमाणात तणाव असणं ही नियमित बाब बनली आहे. लहान मुलांवरचा अभ्यासाचा प्रचंड ताण हा सातत्यानं चर्चेचा विषय बनला आहे. आई-वडील दोघंही काम करत असल्याने मुलांना माया न मिळणं, टीव्ही, सोशल मीडिया आणि मोबाईल यामुळे एककल्लीपणा, आक्रमकपणा वाढणं या समस्याही आहेत. ब्ल्यू व्हेलसारख्या गेममुळे मुलांमधील अस्थिर मनोवृत्ती समोर येत आहे. लैंगिक आक्रमकता, वर्तनातील आक्रस्ताळेपणा समोर येत आहे. याचा अर्थ समाजाचा प्रत्येक लहान-मोठा घटक सातत्यानं तणावाचा सामना करत आहे.

प्रौढांमध्ये सहसा जास्त तणाव असलेलं काम करत रहाणं, काम वेळेवर पूर्ण करण्याचा दबाव, दीर्घकाळ एकाकीपणा असणं, सततचा अतिप्रवास, सहकार्‍यांबरोबरचे तणावपूर्ण संबंध, दीर्घ काळ असलेल्या आर्थिक विवंचना, सातत्याने नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागणं यासारख्या कारणांनी तणाव निर्माण होतात. याखेरीज काही वेळा मूळच्याच त्रस्त मनस्थितीत काही कर्कश्श आवाज, गर्दी, थोडंसं मनाविरुद्ध घडणं यासारख्या बाबीही तणाव निर्माण करतात. भूक किंवा काल्पनिक भीतीही यात भर घालते. मात्र अशा प्रकारे सातत्याने तणाव निर्माण होणं ही बाब सर्वसामान्य नसते, कारण या तणावामुळे शरीरात काही संप्रेरकं तयार होतात. तणाव आला की त्याला तोंड देण्यासाठी शरीरातील यंत्रणा सुसज्ज होतात. या यंत्रणांनी सतत युद्धसदृश परिस्थितीत राहणं निरोगी शरीरासाठी योग्य नसतं. त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तदाबातही वाढ होते. साहजिकच याला पूरक म्हणून जास्त ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील शर्करेचं प्रमाण वाढतं. रक्ताचा प्रवाह पचनसंस्थेपेक्षा दूरवर हातापायांच्या स्नायूंकडे अधिक प्रमाणात वळवला जातो. स्नायूंना थंडावा मिळावा यासाठी हातापायाला घाम येतो. तणाव कमी झाल्यावर ही सारी लक्षणं पूर्वपदावर पोहोचतात. परंतु सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत ही अवस्था वरचेवर निर्माण होते आणि दीर्घ काळ टिकते. म्हणूनच या सर्व लक्षणांचे परिणाम आजाराच्या माध्यमातून व्यक्तीच्या आरोग्यावर होत असल्याचं दिसतं.

तणावाची काही लक्षणं दिसू लागतात. मुलांमध्ये प्रामुख्याने शब्दोच्चारावर याचा परिणाम दिसून येतो. शिवाय सर्वच वयोगटांतील व्यक्तींमध्ये छातीत धडधड होणं, तोंडाला किंवा घशाला कोरड पडणं, लवकर थकवा येणं, आवेगपूर्ण वर्तन, हातापायांना घाम येणं, अपघातप्रवण वागणं, आत्मविश्‍वास खालावणं, डोकेदुखी, निद्रानाश, भूक न लागणं किंवा आत्यंतिक भूक लागणं अशी प्रमुख लक्षणं दिसतात. यातून निर्माण होणार्‍या शारीरिक आजारांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यासारख्या आजारांचा प्रामुख्यानं समावेश असला तरी वयोमानाप्रमाणेच तणावामुळेही अलीकडे विस्मरणासारखा मानसिक आजार बळावताना दिसत आहे. या आजारामुळे अखेरीस स्वतःचाच विसर पडण्यापर्यंत (अल्झायमर्स) रोगाची मजल जाते. याला सहसा वयोमानानुसार मेंदूची वाढत चाललेली अकार्यक्षमताही कारणीभूत असल्याचं दिसतं. पंचेंद्रियांमार्फत माहिती गोळा करून साठवून ठेवण्याचं मेंदूचं कार्य या आजारात मंदावतं. या काळात अनेकदा लहानपणीची घटना आठवते पण अगदी ताजी घटनाही आठवत नाही. पूर्वीच्या काळात भेटलेल्या लोकांना ओळखलं जातं; परंतु काही वेळा स्वतःची मुलं, नातवंडं यांना हे लोक ओळखत नाहीत. अलीकडे या आजाराविषयी लोकांना बर्‍यापैकी माहिती आहे. परंतु पूर्वी अनेकदा या लोकांना विस्मरणाचा आजार झाला आहे यावर घरच्यांचा विश्‍वास बसत नसे. मात्र स्मृतिभ्रंश ही अल्झायमरची सुरुवातीची पायरीही असू शकते. भारतात करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, सध्या 49 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना या आजाराचा त्रास आहे. 65 वर्षांच्या पुढील दर 10 माणसांमागे एकाला स्मृतिभ्रंशाचा आणि अल्झायमर्सचा आजार असल्याचं आढळलं आहे. 85 वर्षांच्या पुढे वय असलेल्यांमध्ये हेच प्रमाण दर चार व्यक्तींमध्ये एक असं आहे. जगात एकूण चार कोटी 68 लाखांहून अधिक लोक या आजाराला बळी ठरले आहेत. आधुनिक औषधांमुळे वयोमर्यादा वाढली असली तरी या आजारामुळे हे वाढतं आयुष्य शाप बनत चाललं आहे. दरम्यान, 2050 पर्यंत जगभरातील साडेतेरा कोटींहून अधिक लोक अल्झायमर्सचे बळी असतील असा भयावह अंदाज जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केला आहे. त्यामुळे मुळातच हा आजार होऊ नये म्हणून तरुणपणापासूनच व्यायाम आणि त्यातही योग व प्राणायामाकडे वळणं आवश्यक आहे. या आजाराची सुरुवातीची लक्षणं दिसू लागली की त्याच्या महत्त्वाच्या उपचारांकडे वळणं ही महत्त्वाची पायरी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा