जाळ्यात अडकलेला सिंह

एका वनात एक सिंह राहत होता. उन्हाळ्याचे दिवस होते. फारच गरम होऊ लागले म्हणून सिंहाची स्वारी एका छायाळ वृक्षाखाली आरामात झोपी गेली. तेथेच उंदरांची वस्ती होती. शांत झोपलेले सिंह महाराज पाहून उंदीर त्याच्या अंगा-खांद्यावर खेळू लागले. थोडा वेळ सिंहाने हे कसे तरी सहन केले; परंतु उंदरांचा त्रास फारच वाढल्याने त्याची झोपमोड झाली. रागानेच त्याने एका उंदराला आपल्या पंज्यात पकडले. त्याला आता फाडून खाणार, तोच उंदराने गयावया करीत त्याला म्हटले,

‘‘महाराज, चुकलो मी. मला क्षमा करा. पुन्हा माझ्या हातून अशी आगळीक घडणार नाही. आपण तर सर्व प्राण्यांचे राजे. आपण महान. मी तर आपणापुढे अगदीच किरकोळ. माझ्या रक्ताने आपले पवित्र हात विटाळू नका. मला जीवदान देणे हे आपल्या मोठेपणाला साजेसे होईल.’’ हे ऐकून सिंहाला त्याची दया आली. त्याने उंदराला सोडून दिले. जाता-जाता उंदीर म्हणाला, ‘‘सिंह महाराज, मी आपले उपकार जन्मात विसरणार नाही.’’ अशा प्रकारे काही दिवस गेले. सिंह महाराज असेच एकदा वनात फिरत फिरत नेमके त्याच झाडाखाली आले. तेथे शिकार्‍याने आधीच एक जाळे लावले होते. त्यात सिंह महाराज अडकले. जाळ्यात जेरबंद होताच सिंहाने सर्व शक्ती एकवटून जाळ्यातून सुटण्याचा प्रयत्न केला असता तो त्यात जास्तच गुरफटला. अखेर निराश झालेला सिंह रागाने ओरडू लागला. हा आवाज उंदराने ओळखला. तो धावतच सिंहाजवळ आला. पाहतो, तर सिंह महाराज जाळ्यात फसलेले.

मग उंदीर म्हणाला, ‘‘महाराज, असे निराश होऊन भिऊ नका. स्वस्थ पडून राहा.’’ असे म्हणत उंदराने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडायला सुरुवात केली. थोड्याच वेळात सिंह महाराज जाळ्यातून मोकळे झाले. त्यांच्यावरील संकट टळले. सिंहाने केलेल्या उपकाराची परतफेड उंदराने अशा प्रकारे केली.

तात्पर्य – कोणाला कमी हलके समजू नये. आपण एखाद्यावर उपकार केले, तर ऐन वेळी त्यातील एखादा तरी आपल्या मदतीला धावून येतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा