का भरते हुडहुडी?

थंडीतल्या थंड वातावरणात हुडहुडी भरणं किंवा उन्हाळ्यात एअर कंडिशनमध्ये बसलेलं असताना थंडी वाजणं ही सर्वसाधारण बाब आहे. पण इतरांना थंडी वाजत नसतानाही तुम्हाला सतत हुडहुडी भरत असेल तर ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. प्रत्येकाचं शरीर थंडीला किंवा थंड वातावरणाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतं. काहींना दहा अंश सेल्सियस तापमानामध्ये आल्हाददायक वाटतं तर काहींना 15 अंश सेल्सियस तापमानातही थंडी वाजू लागते. महिला आणि पुरुष थंडीला वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतात. पण प्रत्येक वेळी असं होत नाही. सतत वाजणारी थंडी हे एखाद्या शारीरिक व्याधीचं लक्षण असू शकतं. शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता निर्माण झाल्यास जास्त थंडी वाजते. म्हणजे ऍनिमियाग्रस्त लोकांना थंडी वाजण्याची शक्यता जास्त असते. लाल रक्तपेशी संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करतात. मात्र शरीरात लाल रक्तपेशी कमी असतील तर थंडी वाजू लागते. ऍनिमिया या विकारात शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. या लोहामुळे लाल रक्तपेशींची निर्मिती होते. लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे थंडी वाजण्याचं प्रमाणही वाढतं.

झोप किती गरजेची आहे हे आपण जाणतो. शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्यात झोपेचीही महत्त्वाची भूमिका असते. अपुर्‍या झोपेमुळे शरीराच्या वेळापत्रकावर आणि झोपेच्या चक्रावर परिणाम झाल्याने अंगावर शहारे येतात, थंडी वाजते. आपल्या शरीराचं 24 तासांचं चक्र ठरलेलं असतं आणि या चक्रात थोडासा बदल झाला तरी त्याचे परिणाम जाणवू लागतात. त्यामुळे सतत थंडी वाजत असेल तर आपल्या झोपेत काही अडथळे येत नाहीत ना, याची खात्री करून घ्यावी. तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीर चरबीचा वापर करतं. या चरबीमुळे आपल्याला उष्ण वाटतं. पण नुकतंच वजन कमी केलं असेल तर थंडी वाजू शकते. चरबी कमी झाल्यास शरीर पुरेशी उष्णता निर्माण करू शकत नाही आणि आपल्याला थंडी वाजते. अर्थात प्रत्येकाच्या बाबतीत असं घडेलच असं नाही. खाण्याशी संबंधित आजार असणार्‍यांना जास्त थंडी वाजते. रेनॉड्स डिसिज हा रक्तवाहिन्यांचा दुर्मीळ असा आजार आहे. यात तापमान कमी झाल्यावर रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे जास्त थंडी वाजते. रक्ताभिसरणाची क्रिया नीट न झाल्यास व्यक्तीचे हात तसंच पायांवर निळसर डाग दिसू लागतात. तापमानच नाही तर ताणामुळेही ही समस्या गंभीर रुप धारण करू शकते. जीवनशैलीत थोडेफार बदल करून या विकारावर नियंत्रण मिळवता येतं.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा