बिघडतंय भारतीयांचं मानारोग्य

सुमारे 20 कोटी भारतीय लोक मानसिक रुग्ण असल्याचा निष्कर्ष द लान्सेट सायकिॲट्री या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला. हे आजार दुर्लक्षित राहतात. कारण आपल्याकडे मानसिक आजारांकडे शारीरिक आजारांइतकं लक्ष अद्यापही दिलं जात नाही. त्यामुळेच ही परिस्थिती अधिकाधिक गंभीर बनत चालली आहे. येत्या काळात या त्रासावर नियंत्रण प्राप्त करण्याचं आव्हान देशापुढे आहे.

2017 मध्ये मानसिक व्याधींनी त्रस्त असलेल्या भारतीयांची संख्या सुमारे 200 दशलक्ष होती. याचा अर्थ दर 7 भारतीयांमागे एकाला मानसिक आजार होता. यात सुमारे चार कोटी 60 लाख भारतीय हे नैराश्याचे बळी होते आणि इतर साडेचार कोटी लोकांना चिंतेचे झटके येत होते. इंडियन स्टेट लेव्हल डिसीज बर्डन इनिशिएटिव्ह मेंटर डिसऑर्डर्स कोलॅबोरेटर्स या नवीन अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला आणि प्रकाशितही झाला. या अहवालात 1990 ते 2017 या अठरा वर्षांमधल्या भारतातल्या मानसिक आजारांचा आणि रुग्णांचा आढावा घेण्यात आला आहे. या काळातल्या आकडेवारीच्या साहाय्यानं करण्यात आलेल्या अभ्यासातून काही गंभीर निष्कर्ष निघाले आहेत. या अभ्यासाच्या एक संशोधिका आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशनच्या डॉ. राखी दंडोरा यांनी या संदर्भात इशारा देताना म्हटलं की, भारतात मानसिक आजारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भारतात मानसिक आजारांचं प्रमाण वाढत आहे हे गेली काही वर्षं सर्वज्ञात आहे. मात्र याचं नेमकं प्रमाण किती भयावह आहे हे या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. या सर्व 20 कोटी भारतीय लोकांकडे मानसिकदृष्ट्या लक्ष देण्याची गरज आहे.

या अभ्यासात राज्यनिहाय माहितीही घेण्यात आली. त्यातून असं दिसून आलं आहे की महाराष्ट्रासह दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये नैराश्याचं प्रमाण उच्चतम आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये नैराश्य अधिक प्रमाणात आढळलं आहे. सुमारे 3.7 टक्के महिलांमध्ये आणि 2.7 टक्के पुरुषांमध्ये नैराश्याचा आजार दिसून आला. त्यातही प्रौढ व्यक्तींमध्ये हा आजार बळावत चालल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रात दुर्लक्षित अवस्थेत राहिल्यामुळे अतिसक्रिय बनण्याचा आजार प्रौढांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. नैराश्य आणि त्याच्याशी संबंधित आत्महत्या या संदर्भात या अभ्यासातून प्रादेशिकतावार माहिती देण्यात आली आहे. दक्षिण भारतात नैराश्याचं आणि चिंतेच्या आजाराचं उच्चतर प्रमाण आहे. तसंच उत्तर भारताच्या तुलनेत या भागात या आजारांमुळे होणार्‍या आत्महत्यांचं प्रमाणही मोठं आहे. मानसिक आजारांमागे वाढता सामाजिक दबाव आणि एकाकीपणाची,वगळलं गेल्याची वाढती जाणीव ही दोन महत्त्वाची कारणं आहेत. म्हणूनच काही मानसोपचारतज्ज्ञांच्या मते देश तीव्र मानसिक आजाराच्या संकटातून चालला आहे. नैराश्य आणि चिंताग्रस्ततेच्या आजारामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून येत असून त्याला गेल्या 15 वर्षांमधली अस्थिर राजकीय परिस्थितीही कारणीभूत असल्याचं या अहवालात पहिल्यांदाच म्हटलं गेलं आहे. भारतात प्रादेशिक स्तरावर मानसिक आरोग्य योजना राबवल्या जाण्याची गरज आहे. फक्त किती लोक आजारी आहेत हे शोधून समस्या सुटणार नाही तर त्यासाठी भक्कम कृती योजनेची गरज असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. भारतात 2016 मध्ये नॅशनल मेंटल हेल्थ सर्व्हेनं 12 राज्यांमधल्या 40,000 लोकांचा अभ्यास केला होता. त्यावेळी 18 वर्षांवरील 11 टक्के भारतीयांना मानसिक आजार असल्याचं दिसून आलं होतं. याचा अर्थच असा होता की सुमारे 15 कोटी लोकांना मानसिक आरोग्यविषयक उपचारांची गरज होती.

मुंबईत अनेकजण नागरी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मानसोपचारासाठी जात असल्याचं दिसून आलं आहे. चार बीएमसी रुग्णालयांमध्ये 2015 च्या ऑक्टोबरपासून 2017 च्या सप्टेंबरपर्यंत एकूण 2.7 लाख लोकांवर उपचार करण्यात आले होते. त्यापैकी 1.7 लाख लोकांनी मानसिक आजारांसाठी उपचार घेतले होते. या अभ्यासानुसार नेमकी आकडेवारी सांगायची तर 2017 मध्ये एकूण 19 कोटी 70 लाख लोकांना मानसिक आजार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतात मानसिक उपचारांवर केल्या जाणार्‍या खर्चात 1990 पासून 2017 पर्यंत सातत्यानं वाढ होत चालली आहे. कारण या काळात रुग्णांची संख्या सुमारे दुपटीनं वाढली. खराब आरोग्य, अपंगत्व किंवा मृत्यू यामुळे होणारं नुकसान डेलीमध्ये मोजलं जातं. डेली म्हणजे डिसॅबिलिटी ऍडजस्टेड लाईफ ईयर्स किंवा आजारांमुळे आयुष्याचं वर्षांमध्ये झालेलं नुकसान. हा आकडा 1990 मध्ये 2.5 होता तो 2017 मध्ये 4.7 म्हणजे जवळजवळ दुपटीनं वाढला आहे.

या अभ्यासातून सुमारे 14.3 टक्के लोकांमध्ये सर्वसामान्य मानसिक दुर्बलता किंवा अस्वस्थता हा आजार दिसून आला होता. याखेरीज 4.5 टक्के लोकांमध्ये विकासात्मक अपंगत्वाचं प्रमाण आढळलं होतं. याखेरीज नैराश्याचं 4.5 टक्के, चिंताग्रस्ततेचं 3.3 टक्के, बायपोलर डिसऑर्डरचं 0.6 टक्के, एडीएचडीचं 0.4 टक्के आणि स्किझोफ्रेनियाचं 0.3 टक्के एवढं प्रमाण आढळलं होतं. एकत्र कुटुंबाच्या अभावामुळे प्रामुख्यानं निवृत्त आणि प्रौढ व्यक्तींकडे योग्य लक्ष देणार्‍या व्यक्ती नसतात. नोकरीव्यवसाय, घरकाम आणि मुलांना सांभाळण्याचा ताण महिलांवर येतो. अकाली थकणं आणि इतर शारीरिक व्याधी जडणं यामुळे त्या चिंताग्रस्त बनतात. पुरुषांवर प्रामुख्यानं अद्यापही रोजगाराचं आणि घर चालवण्याचं प्रचंड दडपण आहे. नोकर्‍यांमधली अस्थिर परिस्थिती आणि कुटुंबाच्या खर्चाचा ताण, काही प्रमाणात व्यसनं आणि आपण कमी पडत असल्याची भावना यामुळे ते प्रामुख्यानं नैराश्याच्या आहारी जातात, असं दिसून आलं आहे. एवढंच नव्हे, तर बालपणापासून कौटुंबिक स्वास्थ्य न मिळणं, सतत परीक्षांचा तणाव, अभ्यासाची चिंता आणि मैदानी खेळांऐवजी मोबाईल, संगणकाचा अतिवापर यामुळे मुलांवरही प्रचंड ताण निर्माण होत आहे. त्यांनाही लठ्ठपणापासून इतरही काही आजार अकाली जडत आहेत. या सगळ्या ताणतणावामुळे मुलांमध्ये तारुण्याच्या काळात नैराश्यावस्था किंवा चिंताग्रस्तता दिसते. एवढंच नव्हे, तर स्किझोफ्रेनियाची लक्षणंही दिसू लागतात. म्हणूनच कुटुंबातलं वातावरण शक्य तितकं आनंदी ठेवण्यावर भर द्यावा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा