सोन्याचा मुकूट आणि चांदीचे पाय

एका मोठ्या शहरात भगवान श्रीविष्णुचे मोठे मंदिर होते.रोज अनेक भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरविले भगवान विष्णुला एक सोन्याचा मुकुट करावा. त्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरविले. गावाच्या बाजूलाच एक अनाथ, अपंग मुलांचा आश्रम होता. त्या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत. गावात भिकुशेठ नावाचे एक श्रीमंत सावकार राहात होते. भिकुशेट आपल्या पैशातून, नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असत. भक्तमंडळींना वाटले की भिकुशेटसारखा दिलदार मनाचा माणूस आपल्याला मदत करेल. सगळे मिळून भिकुशेटकडे गेले. भक्तमंडळीना आपल्या पेढीवर आलेले पाहून भिकुशेटला मोठा आनंद झाला.

त्यांनी भक्तांचा मोठा आदर सत्कार केला. लोकांनी भगवान श्रीविष्णुसाठी सोन्याचा मुकुट करण्याचे सांगितले व भिकुशेटकडून मदतीची मागणी केली. यावर भिकुशेट म्हणाले, मंडळी मी तुमच्या कामात काही मदत करु शकत नाही कारण मी विष्णुला सोन्याचा मुकुट करण्यापेक्षा चांदीचे पाय करण्याचा विचार करत आहे. लोक म्हणाले आम्हाला निश्चित काय ते खरे सांगा. भिकुशेट सर्वांना दोन दिवसांनी येण्यासाठी सांगितले. दोन दिवस निघुन गेले. लोक पुन्हा भिकुशेटच्या पेठीवर गेले असता भिकुशेटच्या शेजारी एक लहान मुलगा बसला होता. भिकुशेटने त्या मुलाला उठायला सांगितले. त्या मुलाला दोन्ही पाय नव्हते. मग भिकुशेटच्या नोकराने एका पेटीतून दोन वस्तू काढल्या ते कृत्रिम पाय होते ते त्या नोकराने त्या अपंग मुलाला व्यवस्थितपणे बसविले. मुलगा हळूहळू चालू लागला. भिकुशेट म्हणाले, भक्तांनो, या मुलाचे नाव विष्णु, हा अपंग असून अनाथ आहे. याला पाय नव्हते म्हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंडू फिरु शकतो. त्या विष्णुला सोन्याचा मुकुटाचा तसा फारसा उपयोग नव्हता पण या विष्णुला पायांची गरज होती. मी याला दिलेले कृत्रिम पाय याच्या दृष्टीने सोन्याचांदीपेक्षा जास्त महत्वाचे आहेत.

तात्पर्य – मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा