दक्षिण आफ्रिका व नेदरलँड या जोखमीच्या देशांमधून नगर जिल्ह्यात आलेत 12 प्रवासी

अहमदनगर शहरात 5, अकोले 4, कोपरगाव 2 आणि राहाता तालुक्यातील एकाचा समावेश- जिल्हा प्रशासनाकडून शोध सुरु

अहमदनगर- गेल्या 15 दिवसांत दक्षिण आफ्रिका व नेदरलँड या अती जोखमीच्या दोन देशांमधून नगर जिल्ह्यात 12 व्यक्ती आल्या असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणने रविवारी (दि.5) सायंकाळी जिल्हा प्रशासनाला कळविली आहे. यामध्ये नगर शहरात 5, अकोले तालुक्यातील 4, कोपरगावमधील 2 आणि राहाता तालुक्यातील 1 प्रवाशाचा समावेश आहे. ही माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने या व्यक्तींचा तातडीने शोध सुरु केला आहे. नगर जिल्ह्यात यापूर्वी विदेश प्रवास करून आलेल्या 15 जणांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर रविवारी (दि.5) सायंकाळी भारतीय विमानतळ प्राधिकरणने विदेशातून नगर जिल्ह्यात आलेल्या आणखी 12 प्रवाशांची यादी पाठविली आहे. विशेष म्हणजे नव्याने आलेले हे प्रवासी ओमीक्रॉनचा प्रादुर्भाव झालेल्या जोखमीच्या दक्षिण आफ्रिका आणि नेदरलॅण्ड या देशांमधून आलेले आहेत. जिल्हा प्रशासनाला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेसह नेदरलॅण्डमध्ये ओमीक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. सोबतच इतरही देशांत याचा फैलाव झाला आहे. त्यामुळे परदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नगर जिल्ह्यात 20 नोव्हेंबरनंतर 12 प्रवासी या अति जोखमीच्या देशातून प्रवास करून आल्याची माहिती प्राप्त होताच प्रशासन सतर्क झाले आहे. महापालिका आरोग्य विभाग, ग्रामीण आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनामार्फत त्यांच्याशी संपर्क केला जात आहे. त्यांची तपासणी करून घेणे, त्यांना विलगीकरणात ठेवणे ही कामे केली जाणार आहेत. या प्रवाशांची पहिली चाचणी केली जाईल. ती निगेटिव्ह आली तरीही त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात येईल. त्यानंतर पुन्हा चाचणी केली जाईल. त्या चाचणीच्या अहवालावर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी कार्यपद्धती ठरवून देण्यात आलेली आहे. नव्याने आलेल्या प्रवाशांमध्ये नगर शहरातील पाच, अकोले तालुक्यातील चार, कोपरगावमधील दोन आणि राहाता तालुक्यातील एक प्रवाशाचा समावेश आहे. यापूर्वीही अहमदनगर जिल्ह्यात 15 प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले होते. त्यांचीही अशा पद्धतीने चाचणी करण्यात येऊन त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सुदैवाने नगर जिल्ह्यात अद्याप एकाही आंतरराष्ट्रीय प्रवाशाची चाचणी पॉझिटिव्ह आलेली नाही.

अहमदनगर शहरात आलेले पाचही व्यक्ती निगेटीव्ह – अहमदनगर शहरात दक्षिण आफ्रिका व नेदरलँण्ड या देशातून आलेल्या पाच व्यक्तींचा महापालिकेच्या आरोग्य विभागाने शोध घेतला असून त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे. या पाचही व्यक्तींची चाचणी निगेटीव्ह आली असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी दिली. पाच पैकी दोघे जण दक्षिण आफ्रिकेतून 21 नोव्हेंबरला नगर शहरात आलेले आहेत. त्यांना येथे येवून 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तर तिघे जण नेदरलँड येथून मागील आठवड्यात आलेले आहेत. त्यांना होम आयसोलेट ठेवण्यात आले आहे. यापुर्वी अमेरिकेतून आलेल्या 2 प्रवाशांची चाचणीही निगेटीव्ह आलेली आहे. या सर्व व्यक्तींचे लसीकरणही झालेले आहे. त्यामुळे अहमदनगर शहराला सध्या तरी कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा धोका संभवत नसल्याचे डॉ. राजूरकर यांनी सांगितले. नगर शहरात परदेशातून अन्य काही व्यक्ती आल्या असतील तर त्यांनी स्वत:हून आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा