24 हजार टन सोन्याचा साठा पाडून

देशात मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा वापराविना पडून आहे. या सोन्याचा अर्थव्यवस्थेसाठी उपयोग व्हावा याकरिता सुवर्ण बँक स्थापन करण्याची गरज असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी म्हटले आहे. भारतीय लोकांमध्ये सोन्याचे बार किंवा दागिने बाळगण्याची मानसिकता प्रचलित आहे. जनतेची ही इच्छा पूर्ण होईल आणि सोन्याचा अर्थव्यवस्थेसाठी उपयोग होईल अशा संकल्पनावर विचार करण्याची गरज आहे. भारतात दागिन्यांच्या स्वरूपात आणि धार्मिक स्थळांत 23 हजार ते 24 हजार टन इतके सोने आहे. जनतेचा प्रत्यक्ष सोने बाळगण्याचा मोह दूर करता येत नसल्यामुळे या सोन्याचे पैशात रूपांतरण होऊन या पैशाचा उपयोग केला जाऊ शकत नाही. सुवर्ण बँक ठेवी म्हणून सोने स्वीकारेल व ही बँक इतरांना पैशाच्या स्वरूपात कर्ज वितरित करू शकेल. रुपिक या फिनटेक कंपनीने या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात बोलताना गांधी म्हणाले की, भारतासारख्या देशाला विकास दर वाढवून जगण्याचा दर्जा वाढवायचा असेल तर सोन्याच्या वापरासारख्या नाविन्यपूर्ण विषयावर विचार करण्याची गरज आहे. सुवर्ण बँक स्थापन करण्यासाठी बँकाविषयीच्या काही नियमात बदल करण्याची गरज आहे. ही बँक अस्तित्वात आली तर सोन्याचे रूपांतरण पैशात करण्यासाठी ही बँक उत्प्रेरक म्हणून काम करू शकेल.

या विषयावर अप्रत्यक्ष स्वरूपात बरेच काम झाले आहे. प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी सार्वभौम सुवर्ण रोखे, डिजिटल स्वरूपात सोने खरेदी केले जात आहे. सोन्याचे एक्सचेंज ट्रेडेड फंड कार्यरत झाले आहेत. हॉलमार्किंग पद्धत अवलंबिण्यात येत आहे. यामुळे सुवर्ण बँकेसाठीसुयोग्य वातावरण निर्मिती झाली आहे. सोने ठेव म्हणून स्वीकारण्याची संकल्पना अंमलात आल्यानंतर नागरिक खुल्या मनाने सोने ठेव म्हणून बँकेत ठेवू शकतील. तसे झाले तर बचतीचा उपयोग सोन्याच्या माध्यमातून भांडवलात रूपांतरित केला जाऊ शकतो. दीर्घपल्ल्यात या विषयावर काम केल्यानंतर प्रत्यक्ष सोन्याऐवजी वित्तीय सोने स्वीकारण्यावर जनता विचार करेल. तसे झाले तर पडून असलेल्या सोन्याचे रूपांतरण भांडवलात होऊन त्याची अर्थव्यवस्थेला मदत होऊ शकेल. त्यामुळे भांडवल वाढले जाईल आणि सरकारला भांडवलासाठी परदेशातील भांडवलावर अवलंबून राहावे लागणार नाही.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा